नाशिकच्या भूमीत अपार ऊर्जा
By Admin | Updated: November 21, 2015 00:02 IST2015-11-21T00:02:20+5:302015-11-21T00:02:43+5:30
स्वामी संविदानंद : तीनदिवसीय संत संमेलनाचा समारोप

नाशिकच्या भूमीत अपार ऊर्जा
नाशिक : नाशिकच्या भूमीत अपार ऊर्जा असून, येथे केलेली साधना सफल होते व साधक साध्यापर्यंत पोहोचतो. या क्षेत्राला अनेक पौराणिक संदर्भ असल्याचेही प्रतिपादन कैलास मठाचे महामंडलेश्वर स्वामी संविदानंद यांनी केले.
कैलास मठाच्या वतीने आयोजित तीनदिवसीय संत संमेलनाचा समारोप शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘नाशिक क्षेत्राचे रहस्यात्मक महात्म्य’ याविषयी विवेचन करण्यात आले. यावेळी सांगण्यात आले की, नाशिकच्या भूमीवर शरभंग, गौतम, मार्कंडेय यांच्यासारख्या महान ऋषींनी तपश्चर्या केली. मच्छिंद्रनाथांनी शबरी विद्येची साधना याच ठिकाणी केली. ब्रह्महत्त्येचे पातक धुवून काढण्यासाठी भगवान शंकराने रामकुंडात स्नान केले. भगवान विष्णूही येथेच येऊन पवित्र झाले. कृतयुगात पद्मनगर, त्रेतायुगात त्रिकंटक, द्वापारयुगात जनस्थान, तर कलियुगात नाशिक असे नामाभिधान नाशिकला प्राप्त झाले. नाशिकमधल्या अनेक मंदिरांना पौराणिक संदर्भ असल्याचेही संत-महात्म्यांनी सांगितले.
संमेलनात दिवसभरात डॉ. नरेंद्र पंड्या, स्वामी स्वरूपानंद, स्वामी रुद्रानंद, स्वामी केशवानंद, स्वामी शाश्वतानंद, स्वामी गोरखपुरी आदिंनी नाशिक तीर्थक्षेत्राविषयी प्रवचने दिली. रात्री स्वामी प्रकाशानंद महाराज यांनी साधकांचे शंका-समाधान केले. (प्रतिनिधी)