रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप
By Admin | Updated: November 21, 2015 00:18 IST2015-11-21T00:17:47+5:302015-11-21T00:18:06+5:30
रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप

रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने मागील वर्षाच्या तुलनेने यंदाच्या रब्बी हंगामासाठी मध्यम मुदतीचे सुमारे ३२ कोटी २३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत नोेव्हेंबर अखेर ८ कोटींनी जादा कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेले असले तरी एकूण लक्षांकाच्या केवळ ४८ टक्केच हे कर्जवाटप असल्याचे समजते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामासाठी १०७ कोटी ५० लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २ लाख १९ हजार ५८८ सभासदांना १ लाख ७० हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसाठी हे पीक कर्ज देण्यात येणार होते. प्रत्यक्षात १२१ कोटी ३ लाख (११३ टक्के) पीक कर्जाचे खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले. मागील खरीप हंगामात हेच वाटप ११८ कोटी २४ लाखांच्या घरात होते. म्हणजेच मागील वर्षापेक्षा यावर्षी जिल्हा बॅँकेच्या वतीने जादाचे खरिपात जादा कर्जवाटप करण्यात आले होते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी २ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील ३ हजार ८२३ सभासदांना ७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी नोव्हेंबर अखेर ३२ कोटी २३ लाख ९३ हजार रुपयांचे (४८ टक्के) पीक कर्ज सभासदांना वाटप करण्यात आले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर अखेरीस रब्बीसाठी २४ कोटी ८३ लाख २३ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत यंदा ८ कोटींनी जादा पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप व रब्बी हंगाम मिळून वर्षभरात ११५० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बॅँकेच्या वतीने ठेवण्यात आले होते. त्यापैकी नोव्हेंबर अखेरपर्यंत १२४२ कोटी ५४ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेने तब्बल ४० कोटींहून अधिकचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)