सिन्नर तालुक्यात ३१ जुलैपर्यंत टॅँकरला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 18:29 IST2019-07-07T18:28:58+5:302019-07-07T18:29:38+5:30
सिन्नर : तालुक्यात ३० जूनअखेर टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याला मुदतवाढ मिळण्यास विलंब झाला होता. त्यामुळे टॅँकरवर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने टॅँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील २७ गावे व ३०२ वाड्या-वस्त्यांना दिलासा मिळाला आहे.

सिन्नर तालुक्यात ३१ जुलैपर्यंत टॅँकरला मुदतवाढ
गतवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा तालुक्याला तीव्र टंचाईचा सामना करावा लागला. आरंभी माणसांबरोबरच जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र तालुक्यात आडवाडी, गुळवंच व खापराळे अशा तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला. ३० जूनअखेरीस तालुक्यातील २७ गावे ३०२ वाड्या-वस्त्यांना ५८ खासगी व सहा शासकीय अशा ६४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. संबंधित गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी १८३ खेपा मंजूर असल्यातरी प्रत्यक्षात १५५ खेपा टाकणे शक्य होत होते. मुदतवाढीचे कुठलेही लेखी आदेश न मिळाल्याने पंचायत समितीने टॅँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा १ जुलैपासून बंद केला होता. त्यामुळे पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून असलेल्या गावांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने टॅँकर सुरूच ठेवण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. तथापि, या मागणीला विलंब चार दिवसांपासून टॅँकर बंद होते. दरम्यान, तालुक्यात समाधानकारक पाऊस नसला तरी रिमझिम पावसाने का होईना टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे ६७ वरून टॅँकरची संख्या ६४ वर आली आहे. जोरदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा तालुकावासीय करीत आहेत. तालुक्यातील नि-हाळे, गुळवंच, सुळेवाडी, धोंडवीरनगर, यशवंतनगर, बारागाव पिंप्री, सोनारी, पाटपिंप्री, फर्दापूर, घोटेवाडी, फुलेनगर, शहापूर, जयप्रकाशनगर, डुबेरे, धुळवड, देवपूर, खोपडी, डुबेरेवाडी, आटकवडे, वडगाव-सिन्नर, खापराळे, पास्ते, हरसुले, सोनांबे, चंद्रपुर, कोमलवाडी या २७ गावांसह ३०२ वाड्या-वस्त्यांना ६४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वारेगाव, पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या तीन गावांच्या शिवरात पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तेथील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मध्यम पावसामुळे ब-याच गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा काही गावांमध्ये टॅँकरद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे.