रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणास मुदतवाढ
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:38+5:302015-12-05T09:10:38+5:30
परवाना नूतनीकरण न घेतल्याने रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली होती. ही मुदत १५ डिसेंबर २०१५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय

रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणास मुदतवाढ
पुणे : परवाना नूतनीकरण न घेतल्याने रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली होती. ही मुदत १५ डिसेंबर २०१५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील १८३७ रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरणाची संधी रिक्षाधारकांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, हे परवाने रद्द करण्यात आल्याची जाहिरात शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिला. त्यामुळे परवाने रद्द झालेल्या रिक्षाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रिक्षा परवान्याची मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर रिक्षा चालकांच्या व संघटनांकडून सातत्याने मागणी केल्यानंतर राज्य सरकारने या रिक्षाचालकांसाठी अभय योजना जाहीर केली.
पुण्यात दोन हजार ४६० रिक्षांचे परवाना नूतनीकरण बाकी होते. त्यापैकी दोन हजार १९ रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण झाले. त्यामुळे उर्वरित या रिक्षांचे परवाने आपोआपच रद्द होणार होते. हे परवाने रद्द न करता, त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणीही शहरातील रिक्षा संघटनांनी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी शासनाकडून ही मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १५ डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या परवान्यांचे नूतनीकरण रिक्षाधारकांना करता येणार आहे.
- रिक्षाचालकांच्या व संघटनांकडून सातत्याने मागणी केल्यानंतर राज्य सरकारने या रिक्षाचालकांसाठी अभय योजना जाहीर केली. एक आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत संबंधित रिक्षाचालकांचे रिक्षा परवाना नूतनीकरण करण्यात आले.
पुण्यात दोन हजार ४६० रिक्षांचे परवाना नूतनीकरण बाकी होते. त्यापैकी दोन हजार १९ रिक्षांच्या परवान्याचे नूतनीकरण झाले; तर पिंपरी-चिंचवडच्या एक हजार ७३३ रिक्षांचे नूतनीकरण बाकी होते, त्यापैकी ३३७ रिक्षांचे परवाना नूतनीकरण केले होते.