स्थापत्यशास्त्र प्रवेश नोंदणी २० जूनपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: June 19, 2017 01:59 IST2017-06-19T01:58:39+5:302017-06-19T01:59:09+5:30
प्रवेशप्रक्रिया : इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापनासाठीही एक दिवस वाढीव

स्थापत्यशास्त्र प्रवेश नोंदणी २० जूनपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क :
नाशिक : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फ तंत्रशिक्षण पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ दिली असून, इंजिनिअरिंग, फार्मसी, स्थापत्यशास्त्र व हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. स्थापत्यशास्त्र प्रवेश नोंदणीसाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, इंजिनिअरिंग, फार्मसी, व हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी १८ जूनपर्यंत मुदत वाढवून दिल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्जांची नोंदणी करून निश्चित करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक विभागातून सुमारे शनिवारपर्यंत ३२ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज निश्चिच केले होते. या आकड्यात मुदतवाढीमुळे १ हजार ७३८ विद्यार्थ्यांची वाढ झाली असून, रविवारपर्यंत अर्ज निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ४१ पर्यंत पोहोचली आहे. यात अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेशासाठी सुमारे १९ हजार १९६ अर्ज निश्चित झाले असून, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी १४ हजार १३, तर हॉटेल व्यवस्थापन प्रवेशासाठी १९२ अर्ज निश्चित झाले आहेत. स्थापत्यशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी रविवारपर्यंत ६४० अर्ज निश्चित झाले असून, यात मंगळवारपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आॅनलाइन नोंदणी करणाऱ्यांसह कागदपत्रांची पडताळणी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने रविवारी (दि.१८) सुमारे १ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
आॅनलाइन नोंदणी करण्याऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी शनिवारी मुदत संपणार असल्याने त्यांचे अर्ज निश्चित केले होते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना अर्ज निश्चत करता आले नाही, त्यांना मुदतवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.