नाशिक : जिल्हा रुग्णालयात निर्माण होणारा आणि दररोज मिळणारा ऑक्सिजन विद्यमान नागरिकांनाच कसाबसा पुरेसा पडत आहे. त्यामुळेच सिव्हीलमध्ये बेड वाढविण्यासाठीची जागा, ऑक्सिजन बेडची यंत्रणा सारे काही उपलब्ध असूनदेखील तिथे १०० ते १५० बेड वाढवण्याच्या प्रयासांना सतत लांबणीवर टाकावे लागत आहे. त्यामुळे जागा आणि बेडची उपलब्धता होऊ शकत असूनही ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांना मिळून नाशिक जिल्ह्यात किमान १२५ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असते. मात्र, प्रत्यक्षात नाशिकला ८५ मेट्रीक टन ऑक्सिजनच उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत कुणालाही नवीन ऑक्सिजन बेड वाढवायचे असले तरी ऑक्सिजनची पूर्तता हाच सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयानेदेखील १५० हून अधिक ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी जागेसह सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मात्र, तेवढ्या रुग्णांना लागू शकणारा ऑक्सिजन आणि जम्बो सिलिंडर्सची पूर्तता होऊ शकत नसल्यामुळेच जिल्हा रुग्णालयातील प्रस्तावित बेडवाढ गत पंधरवड्यापासून लांबणीवर पडली आहे.
इन्फो
ऑक्सिजनची तूट दूर होईना
जिल्ह्यात गत महिन्याच्या प्रारंभापासूनच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला. दरम्यान, गत महिन्यात २१ एप्रिलला झाकीर हुसेनमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यापासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजनअभावी त्यांच्याकडील रुग्ण अन्यत्र घेऊन जाण्यास कुटुंबीयांना सांगितल्याच्या अनेक घटना घडल्या. तर काही रुग्णालयांनी एप्रिलच्या अखेरीस नवीन रुग्ण घेणेच थांबवले होते. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडूनदेखील ऑक्सिजनची ही तूट कमी होऊ शकलेली नाही.
कोट
जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठीचा ऑक्सिजन कोटा अद्याप उपलब्ध झाला नसल्याने बेड वाढवणे शक्य झालेले नाही. पुढील आठवड्यापर्यंत ऑक्सिजन कोटा उपलब्ध झाल्यानंतर बेड वाढविणे शक्य होईल.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक