कार्यकाळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-07-31T23:36:54+5:302014-08-01T01:09:40+5:30
कार्यकाळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

कार्यकाळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
नाशिक : न्यायालयाने फटकारल्याने दिलेली मुदतवाढ मागे घेत राज्य शासनाने राज्यभरातील नगरपालिका व नगर परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका वेळेत घेतल्याने येत्या २१ सप्टेंबरला संपत असलेला कार्यकाळ किमान तीन महिने वाढवून मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
रविवारी (दि. ३) राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आढावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे व प्रभारी मोहन प्रकाश हेही नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीची वेळ साधून जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून पदाधिकाऱ्यांचा संपत असलेला २१ सप्टेंबरचा कार्यकाळ किमान तीन महिने वाढवून देण्याबाबत मागणी करणार असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला सामोरे जाताना मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेला ओळखले जाते. त्याचाच फायदा घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विद्यमान पदाचा लाभ होणार असल्याचे हे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार असल्याचे कळते. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत पदाधिकारी निवड होणार की नाही, याबाबत रोजच चर्चा झडत आहेत.
(प्रतिनिधी)