दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त

By Admin | Updated: February 15, 2017 00:16 IST2017-02-15T00:16:17+5:302017-02-15T00:16:33+5:30

डिव्हाईन सायक्लोथॉन : नॅब, नाशिक सायकलिस्टचा उपक्रम

Expressing affection for the lord | दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त

दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त

नाशिक : कधी टाळ्यांची थाप तर कधी चुटकीच्या चुटचुटीचा मागोवा घेत दिव्यांग सायकलपटूंनी ‘डिव्हाईन सायक्लोथॉन’मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. निमित्त होते नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइन्ड (नॅब) आणि नाशिक सायकलिस्ट यांच्यातर्फे आयोजित ‘डिव्हाईन सायकलोथॉन’चे. व्हॅलेंटाइन डे निमित्त मंगळवारी (दि. १४) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातल्या दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १००हून अधिक दृष्टिबाधित, दिव्यांग, सेलब्रेल प्लासी मुले-मुली तसेच महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. दोनचाकी सायकल, टॅण्डम सायकल, लहान मुलांसाठी तीनचाकी सायकल आणि व्हील चेअर आदिंचा वापर यावेळी करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते झेंडा दाखवून या सायक्लोथॉनचे उद््घाटन करण्यात आले.
डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी, आम्ही सामान्य नागरिकांप्रमाणेच आहोत या आशयाचे विविध फलक दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या. महात्मानगर क्रिकेट मैदानापासून  सुरू झालेल्या या   सायक्लोथॉनची जेहान सर्कल येथे सांगता झाली.  या सायक्लोथॉनमध्ये नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी स्वत:च्या सायकल उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक दिव्यांग सायकलिस्ट सोबत दोन व्यक्तींनी स्पर्धेतील नागरिकांना हे अंतर पूर्ण करण्यास मदत  केली.
यावेळी टाळ्या वाजवून आणि बोटांच्या चुटकीच्या इशाऱ्याचा मागोवा घेत या सायकलिस्टनी ही सायक्लोथॉन पूर्ण केली. या रॅलीतून नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे तसेच हेल्मेट वापरण्याचा संदेश दिला. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजय पाटील, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, जसपालसिंग विर्दी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, दृष्टिबाधित उद्योजक भावेश भाटीया, बँक अधिकारी वैभव पुराणिक, राजेश शुक्ल, नॅबचे रामेश्वर कलंत्री, तसेच नाशिक सायकलिस्टचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)


 

Web Title: Expressing affection for the lord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.