एक्स्प्रेस वे घोटी-सिन्नर मार्गावरच करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:50 IST2016-06-29T22:54:36+5:302016-06-30T00:50:54+5:30
बेलूकरांचा ठराव : तहसीलदारांना निवेदन

एक्स्प्रेस वे घोटी-सिन्नर मार्गावरच करावा
सिन्नर : प्रस्तावित मुंबई - नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे उच्च प्रतीच्या बागायती जमिनीऐवजी सिन्नर - घोटी या महसूल नकाशातील मार्गानेच करण्यात यावा, अशी मागणी बेलू ग्रामपंचायतीने तहसीलदारांना
केली आहे. बागायती क्षेत्रातून
एक्स्प्रेस वे करू नये, असेही त्यात म्हटले आहे.
या मार्गाची नियोजित आखणी बेलू शिवारातील उच्च प्रतीच्या बागायती क्षेत्रातून दर्शविण्यात आली असून, त्यात द्राक्षबागा, विहिरी, जलवाहिन्या, स्मशानभूमी, बंगले, घरांसह विकसित बागायती क्षेत्राचा समावेश आहे. तथापि, सदरचा नियोजित रस्ता इतरत्र हलक्या प्रतीच्या जिरायती क्षेत्रातून घेतल्यास नुकसान कमी होईल. याबरोबरच भूसंपादन व बांधकाम खर्चात शासनाची बचत होणार असल्याचे म्हटले आहे.
रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी स्थळ निरीक्षण करून सदरचा रस्ता डोंगराच्या दक्षिणेकडून करावा, त्यास मंजुरी असल्याचे ठरावात म्हटले आहे. ठरावावर सुचक म्हणून युवराज सखाराम तुपे तर अनुमोदक म्हणून संजय मुरलीधर वारुंगसे यांची नावे आहेत. सदर ठरावाची नक्कल तहसीलदार मनोज खैरनार यांना देण्यात आली. याप्रसंगी सरपंच संजय वारुंगसे, भाऊसाहेब दळवी, माजी सरपंच गणपत तुपे, नवनाथ वारुंगसे, वाळू तुपे, युवराज तुपे, समाधान तुपे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)