निर्यात : वर्षभराचे नियोजन कोलमडण्याची शक्यता
By Admin | Updated: February 14, 2015 00:10 IST2015-02-14T00:10:08+5:302015-02-14T00:10:21+5:30
कमी भावामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

निर्यात : वर्षभराचे नियोजन कोलमडण्याची शक्यता
वणी : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी दर मिळत असल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वर्षभराचे नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून असणारे उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात ८० टक्के द्राक्ष उत्पादक निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करतात. द्राक्षे उत्पादित करताना त्याची नोंदणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावी लागते.
सातबारा उतारा, ज्या क्षेत्रात द्राक्षे उत्पादित करावयाची आहे. त्या क्षेत्राचे वयोमान, कोणते द्राक्ष उत्पादित करणार त्याची माहिती, छाटणीची तारीख, औषध फवारणीची माहिती, ही सर्व माहिती दिल्यानंतर १८ एमएम ते २२ एमएम आकारमान द्राक्षाचे तसेच १७ ते १८ ब्रीक्स (द्राक्षातील साखर प्रमाण) झाल्यानंतर त्या प्लॉटमधील ५ किलो द्राक्षांचा नमुना बेंगलोर किंवा पुणे येथे रेसिड्यूतपासणीसाठी पाठविण्यात येतात. तीन ते चार दिवसांनंतर अहवाल निष्कर्ष येतो, त्यानंतर अनुकूल निष्कर्ष असल्यास मागणी नोंदविण्यात येते. युनाइटेड किंगडम, दुबई या देशांमध्ये काटेकोरपणे अहवाल पालन होते.
तर रशियात त्या तुलनेत अटी शिथील मात्र इंग्लडच्या सुपर मार्केटमध्ये द्राक्ष विक्रीस पाठविण्यापूर्वी अनेक क्लिष्ट व गुंतागुंतीच्या प्रणालीला उत्पादकांना सामोरे जावे लागते, अशी माहिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक माणिकराव देवरे यांनी दिली. या भागातील ग्राहक अतिशय चोखंदळ असतात. लागवडीपासून ते उत्पादनाचे त्यांचे मापदंड असतात त्यांची पूर्तता झाल्यानंतर द्राक्ष खरेदीस मान्यता मिळते. द्राक्षे परदेशात पोहोचल्यानंतर एक महिन्याच्या अंतराने काही अंशी रक्कम खात्यात जमा होते, नंतर पूर्ण द्राक्ष विक्र ीनंतर रक्कम मिळते, अशीही माहिती त्यांनी दिली. मागील वर्षी गणेश व थॉमसन या द्राक्ष जातीला ८० ते ८५ रुपये किलोचा दर मिळाला होता. आता त्याच्यात घसरण होऊन ५० ते ५५ रुपये किलो दर उत्पादकांच्या हातात पडत आहेत. काळ्या जातीच्या द्राक्षांना मागील वर्षी ११० ते ११५ रु पये प्रतिकिलो दर मिळाला होता, तर यावर्षी या प्रणालीत प्रतिकुलता आली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे ५० निर्यातदार आहेत. व प्रतिवर्षी अंदाजे ५०० कंटेनर द्राक्षे तालुक्यातून निर्यात होतात, अशी माहिती उत्पादकांनी दिली. दरम्यान, एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करून निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करून निर्यातीचा जगन्नाथाचा रथ हाकण्याचे आव्हान उत्पादकांसमोर असून, द्राक्ष विक्रीचा हा व्यवसाय ही एक आव्हानात्मक बाब आहे. (वार्ताहर)