सावळ घाटात आढळली मुदतबाह्य औषधे
By Admin | Updated: January 9, 2016 22:20 IST2016-01-09T22:16:14+5:302016-01-09T22:20:28+5:30
सावळ घाटात आढळली मुदतबाह्य औषधे

सावळ घाटात आढळली मुदतबाह्य औषधे
पेठ : नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील सावळ घाटात मुदतबाह्य औषधांच्या जवळपास दोनशे बाटल्यांचा साठा आढळून आला. ही औषधे सरकारी की कोणी खासगी व्यक्तीने टाकून दिली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़
सावळ घाटातील एका वळणावर निकोडीन नावाच्या औषधांच्या भरलेल्या जवळपास दोनशे बाटल्या टाकून देण्यात आल्या आहेत. १०० मिलीच्या एका बाटलीची किंमत ८५ रुपये असून, सुमारे सतरा हजार रुपयांची औषधे मुदतबाह्य होईपर्यंत का पडून होती, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे़ शासन आता सरकारी आरोग्य केंद्रांनाही औषधे खरेदीसाठी अनुदान देत असल्याने ही औषधे नेमकी कोणत्या आरोग्य केंद्रातून टाकण्यात आली हे गुलदस्त्यात असले तरीही रुग्णांना वेळेत औषधे न पूरपता अशा प्रकारे त्यांची नासाडी म्हणजे शासकीय अनुदानाचा गैरवापर असल्याचे दिसून येते़ या औषधाची मुदत मे २०१४ मध्येच संपुष्टात आल्याने एवढे दिवस सदरची औषधे का डांबून ठेवण्यात आली होती, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़(वार्ताहर)