रहिवाशांना स्वातंत्र्याची अनुभूती
By Admin | Updated: December 8, 2015 23:10 IST2015-12-08T22:55:15+5:302015-12-08T23:10:16+5:30
पोलीस ठाणे : शिवम अपार्टमेंट रहिवाशांना सहा वर्षांपासून त्रास

रहिवाशांना स्वातंत्र्याची अनुभूती
संजय शहाणे,इंदिरानगर
प्रभू श्रीरामाला बारा वर्षे वनवास सहन करावा लागला अगदी त्याप्रमाणे नाही, परंतु अर्धे तप इंदिरानगर पोलीस ठाणे असलेल्या शिवम अपार्टमेंटच्या रहिवाशांनी अक्षरश: वनवास सहन केला़अपघातग्रस्त वाहनांनी अडविलेली जागा, फिर्यादी व आरोपींमधील अश्लील भाषेतील शिवीगाळ, पोलिसांसह आरोपींनी सोसायटी आवारात तंबाखू खाऊन केलेली अस्वच्छता आदि कारणांमुळे अपार्टमेंटमधील रहिवासी अक्षरश: त्रासले होते़ दरम्यान, पोलीस ठाणे स्वमालकीच्या जागेत जाणार असल्याने आम्हाला स्वातंत्र्याची अनुभूती मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत
आहेत़
इंदिरानगर परिसरासाठी स्वतंत्र व स्वमालकीच्या जागेत पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी गत पंधरा वर्षांपासून सुरू होती़ यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आंदोलनही केली़ याची दखल घेत १ एप्रिल २०१० मध्ये अंबड व भद्रकाली पोलीस ठाण्याचे विभाजन करून इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली़ मात्र स्वमालकीची जागा नसल्याने इंदिरानगरमधील शिवम अपार्टमेंटचा पहिला मजला तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आला़ विशेष म्हणजे रहिवाशांना विश्वासात न घेता या मालकाने पोलीस ठाण्याला हा मजला दिला होता़
पोलीस ठाण्यामुळे रहिवाशांना उघड विरोध करणे शक्य नव्हते़ त्यातच पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने, अपघातग्रस्त वाहने वाहनतळात पडून असल्याने रहिवाश्यांना वाहने लावण्यास जागाच उरत नसे़ दिवस-रात्र पोलीस ठाण्यात येणारे फिर्यादी व आरोपी यांच्यामधील शिवराळ भाषेतील संवाद, हाणामारीतील जखमींचे इमारतीच्या जिन्यामध्ये सांडणारे रक्त, आरडाओरड, वडाळागावातील झोपडपट्ट्यांमध्ये भांडणामुळे इमारतीच्या आवारात जमणारा जमाव, गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या, या वातावरणाचा लहान मुलांवर होणारा दुष्परिणाम यामुळे रहिवासी त्रस्त झाले होते़ (प्रतिनिधी)