उन्हाळ्यात नाशिककरांना थंडीचा अनुभव : किमान तपमान १०.४
By Admin | Updated: March 12, 2017 20:37 IST2017-03-12T20:37:33+5:302017-03-12T20:37:33+5:30
आठवडाभरापासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, किमान तपमानात सातत्याने घट होत आहे.

उन्हाळ्यात नाशिककरांना थंडीचा अनुभव : किमान तपमान १०.४
नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. यामुळे नाशिककर चार दिवसांपासून उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घेत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ३६.१ अंश इतक्या कमाल तपमानाचा उच्चांक राहिला होता. यानंतर चालू महिन्याचे चार दिवस नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली. शहरातील हवामानात अचानकपणे बदल होऊन थंड वारा वाहू लागल्याने कमाल तपमानाचा पारा खाली उतरला आहे. याबरोबरच रविवारी (दि.१२) किमान तपमानाचा पारा कमालीचा घसरून थेट १०.४ अंशावर स्थिरावला. वाऱ्याचा वेग आणि गारवा जास्त असल्यामुळे शहराचे वातावरण थंड झाले आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच नागरिकांना थंडी जाणवत आहे. सूर्यास्तानंतर थंडीची तीव्रता वाढत असल्याचा अनुभव नाशिककरांना सध्या येत आहे. यामुळे रात्री घरातील पंखेदेखील बंद ठेवणे पसंत केले जात आहे. एकूणच नागरिक सध्या उन्हाळ्यात हिवाळा अनुभवत आहे.
शनिवारी किमान तपमान १६.० अंश इतके नोंदविण्यात आले होते, तर रविवारी थेट सहा अंशांनी पारा घसरला. यामुळे रविवारी संध्याकाळपासूनच थंडीची तीव्रता वाढली होती. होळीनंतर थंडी संपुष्टात येते, असे म्हटले जाते. मात्र होळीच्या रात्रीदेखील किमान तपमान कमीच नोंदविले गेले. होलिकोत्सवानिमित्त शहरात संध्याकाळनंतर चौकाचौकात होळी पेटविण्यात आल्याने थंडीचा प्रभाव कमी जाणवला. आगामी कालावधीत मात्र निसर्ग पुन्हा आपले रूप बदलण्याची शक्यता असून, कमाल तपमान वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. कारण अजून उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असले तरी गेल्या वर्षाचा अनुभव बघता जूनच्या पंधरवड्यापर्यंत नाशिककरांनी कडक उन्हाच्या झळा सोसल्या होत्या. जून महिन्यात सर्वाधिक कमाल तपमान ३५ अंशापर्यंत होते. जूनअखेर पहिल्या पावसाने शहरात हजेरी लावल्याने जवळपास १मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली होती.
शहराचे तपमान असे...
दिनांक कमाल किमान
७ मार्च ३२.६ १४.३
८ मार्च ३२.४ १४.६
९ मार्च ३१.१ १४.९
१० मार्च २८.६ १२.९
११ मार्च २७.६ १६.०
१२ मार्च २९.९ १०.४