८२१ उमेदवारांकडून सात कोटी ७० लाखांचा खर्च
By Admin | Updated: April 28, 2017 02:02 IST2017-04-28T02:02:23+5:302017-04-28T02:02:32+5:30
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८२१ उमेदवारांकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याचा हिशेब सादर झाला आहे.

८२१ उमेदवारांकडून सात कोटी ७० लाखांचा खर्च
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८२१ उमेदवारांकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याचा हिशेब सादर झाला आहे. महापालिकेलाही सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सुमारे ३.५० कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. या साऱ्या खर्चाबाबतचा अहवाल महापालिकेने विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.
२१ फेब्रुवारी २०१७ रोजी नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांसाठी मतदान घेण्यात आले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या निवडणूक प्रक्रियेत एकूण ८२१ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाकडून
प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी १० लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती याशिवाय, निवडणूक कालावधीत होणाऱ्या खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक केले होते.
आयोगाने यंदा तर निवडणूक खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बॅँक खाते उघडण्यास सांगितले होते. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन राजपत्रात नूतन नगरसेवकांची नावे समाविष्ट झाल्यानंतर आयोगाने सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याकरिता व त्याबाबतचे विवरण देण्यासाठी महिनाभराची मुदत दिली होती. त्यानुसार, १५ उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केला.
एकूण ८२१ उमेदवारांनी सादर केलेल्या विवरणपत्रानुसार, निवडणुकीत ७ कोटी ७० लाख ७३ हजार ५१३ रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही निवडणुकीसाठी प्रभावी यंत्रणा राबविली. महापालिकेने निवडणुकीसाठी सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. त्यापैकी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीचे कामकाज पूर्णत्वाला गेल्याने मुख्य लेखापरीक्षकांकडून विभागीय आयुक्तांना अहवाल रवाना करण्यात आला असून, निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)