अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

By Admin | Updated: February 26, 2017 00:01 IST2017-02-26T00:01:23+5:302017-02-26T00:01:37+5:30

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

Exhaustive ambush with confidence | अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

नाशिक : युद्धाला सामोरे जाण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला दुबळा समजून एकहाती ते जिंकल्याचा अति आत्मविश्वास बाळगणे व चोहोबाजूंनी गाफील राहून स्वत:च्या पराभवास कारणीभूत ठरणे, असा अनुभव नाशिक महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना घेत आहे. राज्यात व केंद्रात भाजपाप्रमाणेच सत्तेवर असतानाही महापालिका निवडणुकीत त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा आपल्याच सत्तेला दुषणे देण्याची सेनेची भूमिका जशी मतदारांच्या पचनी पडली नाही, तसेच सत्तेच्या मागे धावताना पदाधिकाऱ्यांनी नात्यागोत्यांमध्ये अडकून पडल्याच्या परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे.  पक्षीय पातळीवर शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण करायचे झाल्यास सेनेच्या या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीचा विचार करावा लागेल. कोणतेही मुद्दे हाती नसताना निव्वळ भाजपा विरोध असा एकमेव अजेंडा घेऊन सेनेने सरकार विरोधात नाशकातून लाखोचा मोर्चा काढून प्रचाराचा शुभारंभ केला व तेथून सेनेत ‘ओपन भरती’ सुरू झाली. जो येईल तो आमचा, अशी भूमिका घेत दररोज मातोश्रीच्या दरबारी प्रवेश सोहळे रंगल्यामुळे सेनेची सूज वाढली व वाढलेली सूज हीच आपली ताकद असल्याचे सेनेने समजले व नेमके येथेच त्यांची चूक झाली. महापालिकेत २२ संख्याबळ असताना सर्वपक्षीय आयात नगरसेवकांमुळे ही संख्या ४६ च्या घरात पोहोचल्याने जणू निवडणुकीपूर्वीच महापालिकेवर ‘भगवा’ फडकल्याच्या व अंगात महापौरपदाचा अंगरखा चढल्याच्या आविर्भावात स्थानिक नेते वावरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सत्ता हस्तगत केल्याचा अति आत्मविश्वास व या सत्तेचा लाभ आपल्याच कुटुंबीयांना मिळावा म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली. उपनेते बबन घोलप यांचा दोन कन्यांमध्ये जीव अडकला, बडगुजर पती-पत्नी रिंगणात तर उतरले, पण त्यांना सुपुत्राच्या काळजीने ग्रासले. विनायक पांडे यांनाही स्वत:सह मुलाच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली. नाशिकचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनाही पुत्राच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटला. त्यामुळे ज्यांच्या अंगाखांद्यावर पक्षाची जबाबदारी विश्वासाने सोपवावी असे वाटावे त्यांचे खांदे अगोदरच नातेवाइकांच्या ओझ्याने निखळलेले असताना निव्वळ सैनिकांच्या भरवशावर लढाई कशी लढली जाणार? त्यातही निष्ठावान सैनिक व आयता आलेला सैनिक यांच्यातील भेदाभेद पराकोटीला पोहोचलेला असताना, कोण कोणाशी लढणार? त्यामुळेच की काय उमेदवारी वाटपावरून झालेली हाणामारी समस्त मतदारांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवली. निवडणुकीपूर्वी पक्षाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू होती याबाबत वरिष्ठ नेत्यांनीही गांभीर्याने घेतले नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सेनेने निव्वळ भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली व स्थानिक प्रश्नांना दुय्यम स्थान दिले, यातून अखेर जे व्हायचे तेच झाले.

Web Title: Exhaustive ambush with confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.