माजी सैनिक संघटनेच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध संताप
By Admin | Updated: September 20, 2016 01:36 IST2016-09-20T01:35:15+5:302016-09-20T01:36:09+5:30
पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी

माजी सैनिक संघटनेच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध संताप
नाशिक : उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारकात दहशवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करून पाकिस्तानचा प्रतीकात्मक ध्वजही जाळण्यात आला.
जम्मू-काश्मीर खोऱ्यातील भारत-पाकिस्तान सीमारेषेपासून जवळ असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला़ पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे हे सदस्य असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून, पाकिस्तानचे पितळ यामुळे पुन्हा एकदा उघडे पडले आहे़ सरकारने पाकिस्तानविरोधात शांततेची भूमिका न घेता गोळीला गोळीनेच प्रतिउत्तर देण्याची मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली़ देशासाठी माजी सैनिक लढाईसाठी केव्हाही तयार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले़ या आंदोलनाप्रसंगी फुलचंद पाटील, मेघश्याम सोनवणे, सुभेदार दिनकर पवार, श्रीराम आढाव, श्रीगुरूदास पाटील आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)