आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा
By Admin | Updated: June 26, 2015 01:20 IST2015-06-26T01:20:02+5:302015-06-26T01:20:25+5:30
आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा

आळंदी उपसा संस्थेचे कर्ज माफ करा
नाशिक : नाशिक तालुक्यातील वाडगाव येथे आळंदी सहकारी उपसा जलसिंचन संस्थेचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी सभासदांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना साकडे घातले आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरची संस्था १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली; परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींवर त्याचा कर्जापोटी बोझा चढला आहे. या संस्थेकडून शेतकऱ्यांना एक थेंबही पाण्याचा मिळालेला नसल्यामुळे वैतागून चार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली. जिल्हा बॅँकेने संस्थेला ७५ लाख रुपये कर्ज दिले होते, त्यापोटी संस्थेच्या सभासदांनी एक कोटी दोन लाख साठ हजार इतकी रक्कम वेळोवेळी बॅँकेत भरली आहे. मात्र शासकीय कर्जमाफीत या संस्थेला एकदाही बॅँकेने कर्जमाफी अथवा व्याजमाफी दिलेली नाही. उलट सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अन्य ठिकाणाहून कर्ज मिळण्याचा मार्गही खुंटला आहे. अलीकडेच बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संस्थेला नोटीस देऊन मुद्दल रक्कम भरून खाते निरंक करण्याबाबत पत्र दिले आहे. परंतु घेतलेल्या कर्जापेक्षाही दुपटीने अधिक रक्कम संस्थेने भरल्यामुळे बॅँकेने संस्थेला कर्जमाफी द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राजू देसले, संपतराव थेटे, पांडुरंग निंबेकर, निवृत्ती कसबे, राजाराम निंबेकर, मधुकर कसबे, सीताराम वाघमारे, दिनकर गोवर्धने, काशीनाथ निंबेकर आदि उपस्थित होते.