सिडको : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने असलेली हातोहात लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. दागिने चोरणारे चोरटे हे सीसीटीव्ही त कैद झाले असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहे.
सिडकोतील शुभम पार्क, बंदावनेनगर येथे प्रमोद विभांडिक यांचे सद्गुरू अलंकार सराफी दुकान आहे. विभांडिक यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान उघडले. दुकानाची साफसफाई करून दुकानाच्या मागील बाजूस पाणी भरण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी शेजारील किराणा दुकानदाराला लक्ष ठेवण्याचे सांगितले. काही वेळानंतर किराणा दुकानात तीन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व दुकानदाराची दिशाभूल केली. तिघे चोरट्या पैकी दोन किराणा दुकानात तर एक ज्वेलरी शॉप मध्ये घुसला. तेथील दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन बाहेर पडला. याचवेळी समेारून आलेल्या विभांडिक यांनाच त्याने सातपूरकडे जाण्याचा पत्ता विचारला. त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी तातडीने दुकानाकडे आले असता बॅग लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, १५० ग्रॅम वजनाचे तसेच सहा हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सात लाखा रुपयांचा मुद्देमाल बॅगेत होता. घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ दाखल झाले आहे. त्यांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता पत्ता विचारणाऱ्या इसमानेच दागिने ठेवलेली बॅग गायब केली असल्याचे समजले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.