१ आॅगस्टपासून पेट्रोल खरेदीवर बहिष्कार
By Admin | Updated: July 28, 2016 01:21 IST2016-07-28T01:18:50+5:302016-07-28T01:21:54+5:30
‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ला विरोध : पंपचालकांनी घेतला निर्णय

१ आॅगस्टपासून पेट्रोल खरेदीवर बहिष्कार
नाशिक : राज्य शासनाने जारी केलेल्या ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ या निर्णयाविरोधात शहरातील सुमारे ४०० पेट्रोल पंपचालकांनी १ आॅगस्टपासून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘नाशिक जिल्हा पेट्रो-डिलर वेल्फेअर असोसिएशन’तर्फे शनिवारी (दि. ३०) बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंपचालकांनी पेट्रोल खरेदीवर बहिष्कार टाकल्यास नाशिकमध्ये पेट्रोलटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या निर्णयाविषयी विचारविनिमय करण्यासाठी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल, डिलर असोसिएशन (फामफेडा) यांच्यातर्फे बुधवारी मुंबईत राज्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाचा निर्णय अमान्य करीत सोमवारपासून (दि. १) पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा पेट्रो-डिलर वेल्फेअर असोसिएशननेही दि. १ आॅगस्टपासून पेट्रोल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या पेट्रोल खरेदीवरील बहिष्काराचा फटका नाशिककरांनाही बसणार आहे. शहरात सुमारे ४०० पेट्रोल पंप असून शासनाच्या निर्णयात हेल्मेट न घातलेल्या वाहनधारकास पेट्रोल देण्याऱ्या पेट्रोल पंपचालकांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे हेल्मेट न घातलेल्या वाहनधारकांना पेट्रोल न दिल्यास वाहनधारकांच्या रोषाला बळी पडत पंपावर वाद, मारामारीसारखे प्रकारदेखील घडतील, अशी भीती पेट्रोल पंपचालकांनी व्यक्त केली असून जोपर्यंत सरकार निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)