गुरूपूजन सोहळा उत्साहात
By Admin | Updated: July 31, 2015 23:18 IST2015-07-31T23:17:15+5:302015-07-31T23:18:12+5:30
साधुग्राम : आखाड्यांमध्ये श्रद्धापूर्वक वातावरणात महंतांचे पूजन

गुरूपूजन सोहळा उत्साहात
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये दाखल झालेल्या विविध आखाड्यांत आणि खालशांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूपूजन सोहळा उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम सज्ज झाले असून, येथील विविध आखाडे आणि खालशांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होत आहेत. शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच पूजापाठ, भजन, अभिषेक आदि कार्यक्रम सुरू होते. काही आखाड्यांचे प्रमुख महंत आपल्या मूळ आश्रमात गेलेले असले तरी त्यांचा शिष्य परिवार तसेच काही आखाड्यांचे साधू-महंत आणि शिष्य परिवार साधुग्राममध्ये असल्याने त्यांनी गुरुपूजनाचा सोहळा साजरा केला. अखिल भारतीय श्री पंच दिगंबर निर्मोही अनी आखाड्यात सकाळी पूजा अर्चन, भजन, गुरुप्रतिमेचे पूजन आदि कार्यक्रम झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादवाटप करण्यात आले. यावेळी महंत परमात्मादास, महंत राजेंद्रदास, नागराम शरणदास आदिंसह संत-महंत उपस्थित होते.
अखिल भारतीय निर्वाणी अनी आखाडा येथेही गुरूपूजन सोहळा झाला. यावेळी भाविकांनी महंत धर्मदास यांचे पूजन केले. अखिल भारतीय दिगंबर आखाड्यात भजन, पूजन आणि प्रसादवाटप आदि धार्मिक कार्यक्रम झाले. पंचमुखी हनुमान सेवा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी आद्य गुरू रामानंदाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत भक्तिचरणदास आदिंसह
संत-महंत आणि भाविक उपस्थित होते.
नर्मदाखंड खालसा येथे गुरूपौर्णिमेनिमित्त महंत रामदास त्यागी महाराज यांचा गुरूपूजन सोहळा झाला. यावेळी ध्रुवदास त्यागींसह शिष्य परिवाराने गुरूंची पूजा केली.
डाकोर खालसाचे मुनींदरदास महाराज ऊर्फ खडेश्वर बाबा यांनी आपल्या गुरूंचे महामंडलेश्वर बजरंगदास महाराज महात्यागी यांचे पूजन केले. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. भय्यादास महाराज यांचा बालाजीधाम खालसा, श्री बटुक हनुमान मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, जनार्दन स्वामी आश्रम आदिंसह तपोवनातील विविध मंदिरे, आश्रम, ट्रस्ट आणि खालशांमध्ये गुरूपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)