नोकरभरतीच्या भ्रष्टाचाराचे खासदारांनी दिले पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2016 02:32 IST2016-09-30T02:27:21+5:302016-09-30T02:32:19+5:30
घरचा अहेर : हरिश्चंद्र चव्हाण यांनी दाखविले धनादेश

नोकरभरतीच्या भ्रष्टाचाराचे खासदारांनी दिले पुरावे
नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्ह्यात नामांकित शाळेत हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी. तसेच नोकरभरतीत उमेदवारांकडून आर्थिक मागणी केली होती. त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता उमेदवारांना दिलेले धनादेश परत आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील संबंधितांवर कठोर कारवाई करावी. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या प्रश्नांची जाण नसलेल्या प्रधानसचिव राजगोपाल देवरा यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे.
नाशिकला आदिवासी विकास महामंडळाच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नोकरभरतीतील आर्थिक नियमिततेचे आरोप करीत पुरावे दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही नोकरभरती आदिवासी विकास विभागात दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्या भरतीत शेकडो उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्यात आली.
मात्र ज्यांना नोकरी लागली नाही. अशा लोकांना पैसे करत करण्याच्या बहाण्याने दिलेले धनादेश वटले नाहीत. ते आपल्याकडे असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण विभागातील कर्मचारी विनोद परदेशी यांनी पेठ तालुक्यातील १० ते १२ उमेदवारांना लाखो रुपयांचे दिलेले त्यांच्या खात्यावरील धनादेश वटलेले नाहीत.
ही गंभीर बाब असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले पाहिजे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. आदिवासी विकास महामंडळाकडे पुरेशी गुदामे नसल्याने खरेदी केलेले धान्य वर्षानुवर्ष पडून राहते. त्यामुळे विविध कार्यकारी संस्थांचे आणि शासनाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तत्काळ बैठक बोलवा, सर्व आदिवासी आमदार-खासदारांना या बैठकीसाठी बोलवा, असेही खासदार चव्हाण यांनी सांगितले.
आदिवासी विकास महामंडळाचे संचालक कोणाच्या मेहेरबानीने नव्हे तर लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांची वर्ष वर्ष बैठक होत नाही, हे दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर नोकरभरतीत पैसे गोळा करणाऱ्या व नंतर उमेदवारांना धनादेश देणारा विनोद घनश्यामसिंग परदेशी यांच्या नावे असलेले तीन धनादेशांची छायांकित प्रत त्यांनी दाखविली.
नोकरभरतीतील लाखोे रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाला त्यामुळे बळकटी मिळाली आहे. (प्रतिनिधी)