रात्रीपर्यंत साडेसात लाख भाविकांचे स्नान
By Admin | Updated: September 12, 2015 23:44 IST2015-09-12T23:44:17+5:302015-09-12T23:44:52+5:30
रात्रीपर्यंत साडेसात लाख भाविकांचे स्नान

रात्रीपर्यंत साडेसात लाख भाविकांचे स्नान
नाशिक : सिंहस्थ पर्वणीच्या एक दिवस अगोदरच रेल्वे, खासगी वाहने, राज्य परिवहन महामंडळ याद्वारे लाखो भाविक शहरात दाखल झाले असून शनिवारी दुपारी बारा ते रात्री १० वाजेपर्यंत सुमारे साडेसात लाख भाविकांनी रामकुंडात स्नान केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे़ दरम्यान शहर पोलिसांनी गर्दीच्या नियोजनानुसार दुचाकी व रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवागी देण्यात आली होती़
सिंहस्थ पर्वणीच्या दोन दिवस अगोदरपासूनच भाविक शहरात दाखल होत आहेत़ धुळे रोड, औरंगाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, त्र्यंबकेश्वर रोड, मुंबई रोड, पुणे रोड या मार्गावरून शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्य महामंडळाच्या ७८० बसेस तर २६११ खासगी वाहनाने भाविक शहरात दाखल झाले होते़ या दरम्यान सुमारे सहा लाख भाविक शहरात दाखल झाले व त्यांनी रामकुंडात स्नान केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
शहरात लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या भाविकांमुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेल्याचे दृश्य होते़ तपोवन, साधुग्राम, रामकुंड या भागात भाविकांची संख्या लक्षणीय होती़ त्यातच पोलिसांनी भाविक व शहरातील नागरिकांना टू व्हिलर व रिक्षांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते़ तर रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी दुपारी सुमारे एक तास नो व्हेइकल झोन तयार केला होता़
या मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होताच पोलिसांनी वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू केली होती़ दरम्यान, पर्वणीच्या दिवशी मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)