झालो पराभूत तरी अभ्यास दौऱ्याचे भूत!

By Admin | Updated: March 18, 2017 23:49 IST2017-03-18T23:49:19+5:302017-03-18T23:49:34+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अवघे चार दिवस बाकी असताना मावळत्या सभागृहातील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना परराज्यातील अभ्यास दौऱ्याचे वेध लागले आहे

Even though we lost track of ghosts! | झालो पराभूत तरी अभ्यास दौऱ्याचे भूत!

झालो पराभूत तरी अभ्यास दौऱ्याचे भूत!

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अवघे चार दिवस बाकी असताना मावळत्या सभागृहातील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना परराज्यातील अभ्यास दौऱ्याचे वेध लागले असून, विशेष म्हणजे वीस सदस्यीय समितीतील अवघी एकमेव सदस्यच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेली आहे. सुमारे पाच लक्ष रुपये खर्चाच्या या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनासाठी समितीच्या आग्रहास्तव प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही सुरू असलेली लगबग संशयास्पद असून, या समितीला अभ्यास दौऱ्यावर पाठवून त्यांच्या ज्ञानाचा(?) लाभ नेमका कोणाला होणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
महिला बाल कल्याण समितीची गेली अडीच वर्षांची वाटचाल तशी बिनकामाचीच ठरली आहे. कारण या समितीचे तीन कोटी रुपयांचे बजेट असताना गेल्या अडीच वर्षांत समितीकडून एकही योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी बालकांना पोषक आहार, गरोदर मातांना पूरक आहार, किशोरवयीन विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षण, स्वसंरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण अशा प्रकारे महिला व बालकांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविण्याची जबाबदारी या समितीवर असताना गेल्या अडीच वर्षांत समितीचे कामकाज मासिक बैठक घेण्यापुरतेच ठरले परिणामी समितीच्या बजेटच्या तीन कोटी रुपयांपैकी एक रुपयाही योजनांवर खर्च होऊ शकला नाही. असे असताना आता मात्र याच समितीला परराज्यात जाऊन महिला व बाल विकासासाठी नवीन काय करता येईल याचा अभ्यास करण्याची बुद्धी सुचली आहे. विशेष म्हणजे या समितीचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या चार दिवसांतच त्यांना परराज्यात जाऊन अभ्यास करून परत यायचे आहे. महिला बाल कल्याण समितीच्या बजेटमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी पाच लाखांची तरतूद राखीव असून, केरळ, हिमाचल यांसारख्या थंड हवामान असलेल्या राज्यांनी महिला व बाल विकाससाठी काय नवीन उपक्रम राबविले त्याची पाहणी ही समिती करणार आहे.

Web Title: Even though we lost track of ghosts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.