पुन्हा मंत्री केले नाही तरी शिवसेना सोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:57+5:302021-09-21T04:16:57+5:30
नांदगाव : माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी स्वत: हून राजीनामा दिला. चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. आरोप कोणीही करू शकतात. ...

पुन्हा मंत्री केले नाही तरी शिवसेना सोडणार नाही
नांदगाव : माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी स्वत: हून राजीनामा दिला. चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. आरोप कोणीही करू शकतात. मी हाडाचा शिवसैनिक आहे. पुन्हा मंत्री बनवायचे असेल तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेतील. आगामी काळात मंत्री मंडळात समावेश झाला नाही तरी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करणार नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांनी नांदगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
नांदगाव येथे गोर बंजारा समाजाच्या मेळाव्यानंतर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राठोड यांनी सांगितले, आमच्या समाजाची ऑल इंडिया बंजारा सेवा संघटना आहे. तिच्या माध्यमातून बंजारा बांधवांचे प्रश्न, समस्या समजावून घेण्यासाठी दौरा असून नांदगाव मध्ये २२ ते २५ तांडे आहेत. मंत्रिपद गेले म्हणून दबाव आणण्यासाठी मेळावे घेत नसून, भाजप शिवसेनेच्या मंत्री मंडळात महसूल राज्यमंत्री होतो तेव्हापासून समाजबांधवांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करतो आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात सुद्धा आमचा समाज आहे. दरम्यान, मंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयी बोलताना राठोड यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वच्छ प्रतिमा व प्रशासन याला न्याय देण्याचे धोरण आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी स्वत: हून राजीनामा दिला तर किरीट सोमय्या यांच्या आरोपांबाबत बोलतानाही सरकारवर असले आरोप होत असतात. त्यातले तथ्य महत्वाचे असते. कोणत्याही पक्षाचा मंत्री असला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. सर्वांचा त्यांचेवर विश्वास असल्याचेही राठोड यांनी सांगितले.