भाविकांची अजूनही गर्दी
By Admin | Updated: September 14, 2015 23:56 IST2015-09-14T23:55:00+5:302015-09-14T23:56:53+5:30
त्र्यंबकेश्वर : पर्वणीचा दुसरा दिवसत्

भाविकांची अजूनही गर्दी
र्यंबकेश्वर : रविवारी कुंभमेळ्याची दुसरी पर्वणी शांततेत पार पडल्यानंतर कुशावर्तात स्नान करण्यासाठी आणि भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरी दाखल होत आहेत. नाशिकच्या रामकुंडावरील स्नान आटोपल्यावर भाविक आता त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत.
रविवारी शाहीस्नान आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी कुशावर्त तसेच गावातील घाटांवर स्नान केले. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी (१४ सप्टेंबर) पहाटेपासून जव्हार फाटा येथून बसमधून उतरल्यानंतर भाविकांनी थेट कुशावर्तावर येणे व स्नान करून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याला पसंती दिली. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून, येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित करून, भाविकांना रस्त्यांचे मार्गदर्शन करून चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाविकांना सुरळीतपणे स्नान व दर्शनाचा लाभ घेता आला. त्र्यंबकनगरीत ठिकठिकाणी अन्नछत्र उभारण्यात आली असून, भाविकांना अल्पोपहार, चहा आदि दिला जात असल्याने कुंभनगरीत अन्नयज्ञही अखंडित सुरू आहे.
देशाच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होत असताना आणि दर्शनासाठी भलीमोठी रांग लागत असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मात्र रोजच्या वेळेतच मंदिर बंद करीत असल्याने भाविकांची निराशा होत आहे. कुंभमेळ्यानिमित्त चोवीस तास खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे..