उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच इच्छुकांकडून ‘आवतने’
By Admin | Updated: January 31, 2017 01:23 IST2017-01-31T01:22:46+5:302017-01-31T01:23:01+5:30
आश्चर्य : सोशल मीडियामार्फत समर्थकांना आवाहन

उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच इच्छुकांकडून ‘आवतने’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान सुरू होणार असली आणि अद्याप एकाही राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी काही उत्साह उमेदवारांनी मात्र सोशल मीडियावरून अमुक एका पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, समर्थकांनी उपस्थित राहण्यासाठी ‘आवतने’ पाठविण्यास सुरुवात केली आहे.
निफाड तालुक्यातील एका गटातून अमुक एका पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोमवारी (दि.३०) सोशल मीडियावर झळकल्यानंतर तालुक्यातील त्या पक्षाकडून इच्छुक असलेल्यांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे चित्र होते. असाच काहीसा प्रकार अन्य तालुक्यातील गट व गणांमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्यांकडून सोशल मीडियावर सुरू झाला आहे. दुसरीकडे अद्यापपर्यंत केवळ उमेदवारांच्या मुलाखतींचा सोपस्कार संपलेला नसतानाच काही इच्छुकांनी स्वयंभू उमेदवारी जाहीर करीत थेट उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केल्याने तो सर्वच चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या एक तारखेपासून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासूनच निवडणुकीतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)