निधी मंजूर होऊनही सातपूर बसस्थानक रखडले
By Admin | Updated: December 4, 2015 22:02 IST2015-12-04T22:00:57+5:302015-12-04T22:02:00+5:30
नितीन भोसले यांचा आरोप : ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी

निधी मंजूर होऊनही सातपूर बसस्थानक रखडले
सिडको : नाशिक पश्चिम मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितीन भोसले यांनी त्यांच्या आमदारनिधीतून सातपूर येथे अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी सर्व अटी, शर्ती पूर्ण करून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर केला आहे. परंतु यास वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्यापही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
माजी आमदार नितीन भोसले यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघातील सातपूर भागात अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी पाठपुरावा करून यासाठी शासनाकडून सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर करून घेतला. बसस्थानक बांधण्यासाठीच्या सर्व अटी, शर्ती पूर्ण केल्यानंतर या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधीही
गेल्या २० आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही करण्यात आला असल्याचे भोसले यांनी सांगितले, परंतु आजमितीला या ठिकाणी बसस्थानकाचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
याबाबत भोसले यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्राद्वारे कळविले आहे. संबंधित मक्तेदार एजन्सीने लोएस्ट रेटने टेंडर भरले असल्याचे कारण सांगून काम करण्यास तयार नसल्यास त्यास काळ्या यादीत टाकावे व सातपूर बसस्थानकाची
निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यात
यावी, याबाबत भोसले यांनी
बांधकाम विभागास लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
भोसले यांनी सदर पत्र राज्याचे मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, सहकार पणन व वस्त्रोद्योगमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व उद्योगमंत्र्यांनाही देऊन कळविले आहे. (वार्ताहर)