ऑनलाईन नोंदणी करूनही फिरावे लागले माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:02+5:302021-05-05T04:25:02+5:30

देशपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस व फ्रंटलाईन वर्कर ...

Even after registering online, I had to go back | ऑनलाईन नोंदणी करूनही फिरावे लागले माघारी

ऑनलाईन नोंदणी करूनही फिरावे लागले माघारी

देशपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस व फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य देण्यात येऊन त्यानंतर ४५ वयोगटाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण सुरू करण्यात आले. प्रारंभी या लसीकरणाविषयी देशपातळीवरूनही काही समज, गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. अक्षरश: काही लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट होऊन मोठ्या प्रमाणावर लस वाया जाण्याचे प्रमाणही वाढले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, नागरिकांना लसीचे महत्त्व पटू लागल्याने लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे. लसीची मागणी व पुरवठा यात गेल्या काही दिवसांपासून तफावत जाणवू लागली. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढल्यामुळे लस घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. शासनाने १८ वर्षे वयोगटापुढील साऱ्यांनाच लस खुली केल्यामुळे केंद्रांवर गर्दी होत आहे. लस शिल्लक नसल्याने आरोग्य खात्याचीही दमछाक होत असताना काही नागरिकांनी नाशिक शहरात लस शिल्लक नसल्याचे पाहून शासनाच्या कोविन ॲपवर ऑनलाईन कुठे लस शिल्लक आहे का याची माहिती घेतली असता जिल्ह्यातील हरसूल व चांदवड प्राथमिक आरोग्य केंद्रात लस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून काही नागरिकांनी स्वत:ची नोंदणी केली. त्यावर या सर्वांनाच दुपारी एक ते तीन अशी वेळ देण्यात आली. नाशिक शहरातून मोटारीने आरोग्य केंद्र गाठलेल्या नागरिकांच्या पदरी मात्र निराशा पडली. तेथे गेल्यावर लस शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. सकाळी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याने लस देण्यात आल्याचे व मोजकाच साठा असल्यामुळे लस संपल्याचे सांगून आरोग्य अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.

चौकट====

ऑनलाईन नोंदणी कशासाठी?

शासनाच्याच ॲपवर नोंदणी करून दुपारची वेळ निश्चित करून देण्यात आली होती. त्यानुसार वेळेवर केंद्रावर पोहोचलो. परंतु, तेथे गेल्यावर लस शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. शंभर किलोमीटरची फरफट झाली. लस सकाळीच संपली तर कमीत कमी यंत्रणेमार्फत नोंदणी केलेल्या व्यक्तींना दूरध्वनीवरून कल्पना द्यायला पाहिजे किंवा मग ऑनलाईन नोंदणीत सुधारणा केली जावी.

- नाना जगताप, गोविंदनगर

Web Title: Even after registering online, I had to go back