स्मार्ट मिशन संपले तरी साडेपाचशे कोटींची कामे सुरूही नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:07+5:302021-07-04T04:11:07+5:30
संजय पाठक, नाशिक : केंद्र सरकारने आखलेल्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये महापालिकेचा सहभाग निश्चित झाला आणि त्यानंतर पाच वर्षांच्या मिशनचा ...

स्मार्ट मिशन संपले तरी साडेपाचशे कोटींची कामे सुरूही नाहीत!
संजय पाठक, नाशिक : केंद्र सरकारने आखलेल्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये महापालिकेचा सहभाग निश्चित झाला आणि त्यानंतर पाच वर्षांच्या मिशनचा कालावधी संपुष्टात आला आहे. नव्यानेे मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या कालावधीत सर्व कामे संपली नसून सुमारे साडेपाचशे काेटी रुपायांच्या कामांचे तर प्रस्तावही तयार झालेले नाहीत. स्मार्ट म्हटले की, तंत्रज्ञानामुळे साधलेली वेगवान गती वाटते. मात्र, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची द्रुतगती नव्हे तर संथगती कारभाराचा प्रत्यय आला आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून स्मार्ट सिटी योजनेची घाेषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात सादरीकरण करण्याच्या आधारे नाशिक महापालिकेचा समावेश होऊ शकला नाही. दुसऱ्या टप्प्यात अनेक शहरांचा कमी अधिक निकषात बसवून त्यात समावेश करण्यात आला. नाशिक महापालिकेला या योजनेत समावेशाचे अप्रूप वाटले असले तरी गेल्या पाच वर्षांचे मूल्यमापन करताना स्मार्ट सिटीपेक्षा नाशिक महापालिका बरी असे म्हणायची वेळ आली. स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराचे पाच वर्षांचे मूल्यमापन केले तर यापेक्षा वेगळे काही नागरिकांच्या हाती लागले नाही.
मुळात स्मार्ट सिटी कंपनीची संकल्पना ही पारंपरिक कामांसाठी नव्हे तर शाश्वत विकास या जागतिक आशयावर आहे, हे कधी सरकारी यंत्रणा आणि कंपनी किंबहुना महापालिकेलाही उमगले नाही. त्यामुळे कंपनीने पॅन सिटी, एबीडी (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट), कन्वर्जन असे विविध शीर्ष तयार केले असले तरी कामे मात्र अत्यंत पारंपरिकच होती. नाशिक महापालिकेने या योजनेत सहभाग नोंदवला तेव्हा ११०८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यात केंद्र शासनाकडून पाचशे कोटी, राज्य शासन आणि नाशिक महापालिका यांच्याकडून अडीचशे कोटी रुपये असे निधीचे शेअरिंग होते. गेल्या पाच वर्षांत कंपनीला एकूण ४९४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी १५३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, जी कामे सुरूच झाली नाहीत असे सुमारे साडेचारशे कोटी प्रकल्प अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीने पाच वर्षात काय काम केले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्फो...
सध्या रखडलेली कामे
पाणीपुरवठा कामे - २५६ कोटी
ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट - ५२ कोटी ४२ लाख
ग्रीन फिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर - २०९ कोटी ५९ लाख
कुशल स्कील डेव्हलपमेंट - १८ काेटी
गावठाण विकासातील उर्वरित कामे - १०८ कोटी
एकूण - ४४५ कोटी २३ लाख रुपये