दुर्घटना घडल्यानंतरही अवघ्या अर्ध्या तासात झाकीर हुसेन फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:48+5:302021-04-23T04:16:48+5:30
नाशिक : ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेवर शंका उपस्थित करून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू करण्यात आले ...

दुर्घटना घडल्यानंतरही अवघ्या अर्ध्या तासात झाकीर हुसेन फुल्ल
नाशिक : ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेवर शंका उपस्थित करून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र सामान्य नागरिकांचा महापालिकेच्या यंत्रणेवर विश्वास असल्याचे दिसून आले आहेत. बुधवारी (दि. २१) झालेल्या दुर्घटनेत २४ रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रिक्त झालेल्या बेडवर अवघ्या अर्ध्या तासात नवीन रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय फुल्ल झाले. सायंकाळी ५ वाजेनंतर याच रुग्णालयात वेटिंग सुरू झाले.
महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरलेले आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी ते वरदान ठरले. आता तर खासगी रुग्णालयात बेड मिळत नसणाऱ्यांना ते उपयुक्त आहेच, परंतु सध्या तर बिटको किंवा डॉ. झाकीर हुसेन ही महापालिकेची रुग्णालयेच रुग्णांच्या प्राधान्यक्रमावर आहेत. बुधवारी (दि. २१) या रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला गळती लागली आणि रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्याने २४ रुग्ण दगावले. यावेळी रुग्णांच्या आप्तेष्टांचा आक्रोश आणि संताप स्वाभाविक असला तरी राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले. प्रशासनावरही थेट आरोप झाले.
दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास रुग्णालय सुरळीत झाल्यानंतर या रुग्णालयात २४ मृत रुग्ण तसेच अन्यत्र स्थलांतरित केलेले पाच रुग्ण अशा २९ बेड रिक्त झाल्या. परंतु अवघ्या अर्धा तासात हे बेड पूर्ण पणे भरले गेले. इतकेच नव्हे तर सायंकाळी ५ वाजेनंतर या ठिकाणी पुन्हा काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक वेटिंगसाठी येऊन दाखल झाले. काही रुग्णांना तर याच रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या हॉलमध्येच खाली गाद्या टाकून ऑक्सिजन दिला जात आहे. तर दुसरीकडे अनेक जण तेथेच थांबून आहे.
कोट...
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर अवघ्या अर्धा तासात रुग्ण दाखल झाल्याने ते पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर बुधवारी सायंकाळपासून पुन्हा वेटिंग सुरू झाले.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका