नेपाळला धर्मनिरपेक्ष देश घोषित करण्यामागे युरोपियन युनियन
By Admin | Updated: September 21, 2015 23:50 IST2015-09-21T23:50:05+5:302015-09-21T23:50:24+5:30
संत-महंतांचा आरोप : पुन्हा हिंदू राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न

नेपाळला धर्मनिरपेक्ष देश घोषित करण्यामागे युरोपियन युनियन
नाशिक : नेपाळमधील बहुसंख्य जनता ही हिंदू असून, गेल्या शेकडो वर्षांपासून हा देश हिंदू राष्ट्र म्हणून प्रचलित होता. परंतु युरोपियन युनियनने कोट्यवधी रुपये व्यय करून तेथील राज्यघटना हिंदूराष्ट्र ऐवजी धर्मनिरपेक्ष करण्याचा घाट घातला आणि संसदेने त्याला मंजुरी दिली, असा आरोप साधुग्राममधील संत-महंतांनी केला आहे.
संत-महंतांची साधुग्राममध्ये बैठक झाली. यावेळी छत्तीसगड मंडळाचे बालयोगी रामबालकदास म्हणाले की, नेपाळची अर्थव्यवस्था ही भारतावर अवलंबून असून, भारत व नेपाळची संस्कृती समान आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नेपाळ व भारत यांचे चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी, तसेच नेपाळमधील बहुसंख्य हिंदू जनतेची हिंदू राष्ट्र करण्याची मागणी मान्य करण्यासाठी तेथील शासनावर दबाव आणावा, नेपाळ येथील श्रीजानकी मंदिराचे महंत रामरोशनदास महाराज म्हणाले की, नेपाळ आणि भारताचे संबंध प्राचीन काळापासून बंधूत्वाचे असून, येथील धर्म आणि संस्कृती एकच आहे. त्यामुळे भारताने नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून कसे राहील यासाठी प्रयत्न करावेत. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि नेपाळ येथे हिंदू संघटनेचे कार्य करणारे डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी स्पष्ट केले की, नेपाळ हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याप्रसंगी अन्य संत-महंतांनीदेखील आपले विचार मांडले (प्रतिनिधी)