सातपूरमध्ये ९१ मंडळांकडून श्रींची स्थापना
By Admin | Updated: September 6, 2016 01:16 IST2016-09-06T01:15:58+5:302016-09-06T01:16:15+5:30
श्री गणरायाच्या आगमनाचा जल्लोश : ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष

सातपूरमध्ये ९१ मंडळांकडून श्रींची स्थापना
सातपूर : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषणात आणि ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करीत भक्तिपूर्ण आणि मंगलमय वातावरणात सातपूर परिसरातील घराघरात श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने मागील वर्षापेक्षा यावर्षी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या संख्येत ३५हून अधिक मंडळांची भर पडली असून, यावर्षी सुमारे ९० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे.
सातपूर परिसरात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी सोमवारी सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू होती. प्रतिष्ठापनेसाठीचा काढलेला मुहूर्त साधत गणेशभक्तांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. बहुतेक सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांनी गेले दोन ते तीन दिवसांपासून रात्रंदिवस प्रयत्न करून देखावे पूर्ण केले असून, ज्यांचे देखावे अपूर्ण होते त्यांनी देखावे पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांमध्येही श्रीगणरायांची स्थापना करण्यात आली आहे. (वार्ताहर)