राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ
By Admin | Updated: July 25, 2016 00:02 IST2016-07-24T23:50:32+5:302016-07-25T00:02:57+5:30
राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ

राज्य घटनेत कायद्याचे सार : वाघ
देवळाली कॅम्प : भारतात अनेक धर्म व धार्मिक ग्रंथ आहेत. परंतु खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटना हाच देशाचा धर्मग्रंथ आहे. राज्य घटनेमुळेच देश सक्षम व एकात्मतेमध्ये बांधला गेला आहे. भारतीय राज्य घटना हक्क व विवेकावर उभी असून, ती कायद्याचे सार आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.
लॅमरोड येथे एसव्हीकेटी महाविद्यालय व देवळाली कॅम्प भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान या विषयावर माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांचे व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी शरीरात जसा आत्मा महत्त्वाचा आहे तसेच भारतामध्ये संविधान हे आत्म्याचे प्रतीक आहे. त्यांनी न्याय, स्वातंत्र, सार्वभौम, बंधुत्व, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र व मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी गोदावरीचे भविष्य व आपले कर्तव्य या विषयावरील डॉक्युमेंटरी फिल्म बनविणारा माजी विद्यार्थी प्रवीण पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक जीवन गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. मंगला निकुंभ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सुनीता आडके व आभार विकास पोपटकार यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)