घंटागाडी प्रस्तावात त्रुटी
By Admin | Updated: August 2, 2016 01:29 IST2016-08-02T01:24:44+5:302016-08-02T01:29:18+5:30
आयुक्तांचे स्पष्टीकरण : आरोग्याधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल

घंटागाडी प्रस्तावात त्रुटी
नाशिक : वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्याच्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याचे स्पष्टीकरण देत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, कचरा संकलनाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी खतप्रकल्पावर स्वयंचलित वजनकाटा यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडीचा १७६ कोटी रुपयांचा पाच वर्षे कालावधीसाठी विभागनिहाय ठेका देणारा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. मात्र, सदर प्रस्तावाबाबत सत्ताधारी मनसेसह शिवसेनेने अनेक शंका उपस्थित करत ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यातच आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख गृहित धरून तयार केलेला प्रस्तावही हास्यास्पद बनलेला असताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. आयुक्तांनी सांगितले, घंटागाडीच्या ठेक्याबाबत कोणत्याही अटी-शर्तीत बदल करण्यात आलेला नाही. मूळ निविदाप्रक्रियेत जी लोकसंख्या नमूद करण्यात आलेली आहे तीच स्थायीला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात आहे. मुळात लोकसंख्येच्या बाबतीत प्रस्तावात त्रुटी आहेत. सन २००१ ते २०११ या कालावधीत शहराच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी २.०३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मात्र, प्रस्तावात ५ टक्के वाढ नमूद करण्यात आलेली आहे. शहराची आजची लोकसंख्या सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक नाही. सन २०११ मध्ये घंटागाडीची जी निविदाप्रक्रिया राबविली होती त्यावेळीही पाच टक्के लोकसंख्या वाढ गृहित धरण्यात आलेली होती. वास्तविक ती सुमारे दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास नमूद करणे गरजेचे होते. त्याबाबत त्रुटी असल्याने आरोग्याधिकाऱ्यांकडून संपूर्ण अहवाल मागविण्यात आला आहे.
मुळात महापालिका लोकसंख्येच्या आधारे ठेकेदारांना देयके अदा करणार नसून कचरा संकलनावरच देयके निश्चित होणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे त्यावर नियंत्रण राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)