‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’
By Admin | Updated: April 13, 2015 01:48 IST2015-04-13T01:47:07+5:302015-04-13T01:48:52+5:30
‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’

‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’
नाशिक : दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, कठीण प्रसंगांना तोंड देण्याची जिद्द असेल, तर यशाला गाठू शकतो, या विचारातून काम करीत राहिल्यानेच मेळघाटातील कुपोषणासारख्या समस्येची तीव्रता कमी करता आली, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष सातव यांनी केले. भारत ज्ञान विज्ञान समितीच्या वतीने महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे डॉ. सातव यांचे व्याख्यान झाले. डॉ. सातव हे वीस वर्षांपासून मेळघाटातील धारणी परिसरात कोरकू आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांनी ‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’ या विषयावर बोलताना आपल्या कार्याचा पट उलगडून दाखवला. ते म्हणाले, मेळघाट हा अद्यापही दुर्लक्षित भूभाग असून, तेथील आदिवासींमध्ये आजारांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. आपण चंद्र-मंगळावर पोहोचलो असलो, तरी आदिवासींना मात्र साध्या आजारांवर उपचार मिळत नाहीत. कुपोषणामुळे मुले मृत्युमुखी पडतात. मेळघाटात आजही ६० टक्के प्रसूती घरात होते. त्यामुळे तेथे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. स्वत:चा आनंद शोधण्यासाठी मेळघाटात एका झोपडीत काम सुरू केले. सुरुवातीला लोक येत नव्हते. त्यामुळे गावोगावी शिबिरे घेऊ लागलो. अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पत्नी डॉ. कविता ही डोळ्यांची सर्जन असल्याने तिची मदत झाल्याचे डॉ. सातव म्हणाले. वासंती सोर अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव हुदलीकर, प्रा. मिलिंद वाघ व कार्यकर्ते उपस्थित होते.