फ्यूनिक्युलर ट्रॉली सेवेत दाखल करा
By Admin | Updated: May 15, 2017 00:41 IST2017-05-15T00:40:56+5:302017-05-15T00:41:08+5:30
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर टॉलीची पाहणी करून भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा आदेश पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे

फ्यूनिक्युलर ट्रॉली सेवेत दाखल करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील रेंगाळलेल्या फ्यूनिक्युलर टॉलीची पाहणी करून येत्या १ ते १५ आॅगस्ट दरम्यान भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा आदेश पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. आज सप्तशृंगगडावर मंत्री जयकुमार रावल हे आदिमाया सप्तशृंगीचरणी हजेरी लावत नतमस्तक झाले.
पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल हे आज सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर आले होते. यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी देवी न्यासाच्या वतीने मंत्रिमहोदयांचे स्वागत करण्यात आले. मंत्री रावल यांनी देवीची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी मुडेवार, भाजपाचे प्रदेश सदस्य विकास देशमुख, संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कळवणचे कार्यकारी अभियंता कांकरिया, उपअभियंता केदार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार आदी उपस्थित होते. देवीदर्शनानंतर गडावरील पर्यटन विकास विभागामार्फत झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामांची माहिती घेत, फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे बाकी असलेली तांत्रिक व प्रशासकीय कामे त्वरित पूर्ण करून १ ते १५ आॅगस्ट दरम्यान ट्रॉली भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा यांना दिले. तसेच सप्तशृंगगडावरील स्काय वॉक, रिंग रोडचे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामपंचायतीने पर्यटन विकास विभागांतर्गत भक्त निवास, व्यावसायिक गाळे व सुलभ शौचालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्रिमहोदयांनी शौचालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत गडावरील विविध विकासकामांबाबत मंत्रालयात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच सुमन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, राजेश गवळी, ग्रामस्थ संदीप बेनके, मधुकर गवळी, दीपक जोरवर, गोविंद कोठावदे, दादा मोरे, सचिन सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश कडवे, उपतालुकाध्यक्ष विनायक दुबे, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव, विजय वाघ आदी उपस्थित होते.