अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेचे प्रबोधन
By Admin | Updated: January 16, 2015 00:06 IST2015-01-16T00:06:39+5:302015-01-16T00:06:51+5:30
नागरिकांना आवाहन : सामासिक अंतर तपासून काढा अतिक्रमण

अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेचे प्रबोधन
नाशिक : महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर नागरिक व व्यावसायिकांकडून स्वत:हूनच अतिक्रमित बांधकाम हटवले जाऊ लागले आहे; परंतु प्रमुख रस्त्यांपासून इमारतीपर्यंत सामासिक अंतर किती असावे याबाबतची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करत महापालिकेने प्रथम प्रबोधनासाठी पुढाकार घेतला असून, संबंधितांनी सामासिक अंतर तपासून स्वत:हूनच अतिक्रमण काढून घ्यावे, याबाबतचे आवाहन केले आहे.
मागील आठवड्यात गंगापूररोड व पेठरोड परिसरात जोरदार अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आठ दिवस मोहीम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेत नागरिकांना स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर नागरिक व व्यावसायिकांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनधिकृत बांधकाम स्वत:हूनच हटविण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, अनेक नागरिक व व्यावसायिकांमध्ये त्यांनी केलेल्या बांधकामांबाबत संभ्रमावस्था आहे. आपले बांधकाम हे अतिक्रमित आहे किंवा नाही, यासंबंधी आता महापालिकेनेच नागरिक व व्यावसायिकांसाठी विकास नियंत्रण नियमावलीतील अधिकृत बांधकामांसंबंधी माहिती देणारा तक्ता प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर किमान ७५० चौ. मी. क्षेत्राचा भूखंड असेल तर किमान पुढावा १८ मीटर सामासिक अंतर सोडणे गरजेचे आहे. स्वतंत्र इमारत असेल तर रहिवासी कारणासाठी रस्त्याच्या मध्यापासून २५ मीटर आणि व्यावसायिक कारणांसाठी ३७.५० मीटर किंवा कमीत कमी ६ मीटर वा इमारतीच्या एक चतुर्थांश यापैकी जे जास्त असेल तेवढे सामासिक अंतर सोडणे आवश्यक आहे. २४ मीटर रस्ता किंवा त्यापेक्षा जास्त मोठा रस्ता असेल तर ६०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी १८ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल तर इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ६ मीटर सामासिक अंतर सोडावे. १५ मीटर ते २४ मीटरपर्यंत रस्त्यालगत ५०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी १५ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ४.५० मीटर सामासिक अंतर सोडावे. १२ ते १५ मीटर व त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगत २५० चौ.मी. भूखंड असेल, तर १२ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर रहिवासी कारणासाठी इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ३ मीटर आणि व्यावसायिक कारणांसाठी ४.५० मीटर सामासिक अंतर सोडावे. १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते असल्यास त्याठिकाणी १०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी ८ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर रहिवासी कारणासाठी इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ३ मीटर सामासिक अंतर सोडावे. ५० चौ.मी. क्षेत्र भूखंडावरील रो-हाउसकरिता पुढावा ४ मीटर सोडणे आवश्यक आहे. बाजूचे आणि पाठीमागील सामासिक अंतराबाबतही नियमावली प्रसिद्ध केली आहे. नागरिकांना नकाशाबाबत शंका असल्यास नगररचना विभागाकडून त्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.