‘त्या’ अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती
By Admin | Updated: April 9, 2015 00:05 IST2015-04-09T00:04:42+5:302015-04-09T00:05:00+5:30
१० पर्यंत कोठडी लॉकरमध्ये २३ तोळे सोने; शहरात प्लॉट्स

‘त्या’ अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती
नाशिक : ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे़ यामध्ये पाच लाख ७३ हजार ९६५ रुपये रोख, २३ तोळे सोने, ९१ हजार १२२ रुपये किमतीची चांदीची भांडी तसेच नाशिक शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या पाच प्लॉटचा समावेश आहे़ दरम्यान, बुधवारी(दि़८) अभियंता दशपुते यांना न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पाटबंधारेखात्यातील बहुचर्चित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यानंतर या खात्यातील हे दुसरे प्रकरण आहे़
पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत २००९-१० मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या चार गावांमधील रस्त्याचे मातीकाम व डांबरीकरण तसेच पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम शासनाचे नोंदणीकृत ठेकेदार तथा तक्रारदाराने घेतलेले होते़ या कामासाठी शासकीय नियमानुसार बँक आॅफ बडोदामध्ये ३३ लाखांची अनामत (बँक गॅरंटी) भरून १५ फेब्रुवारी २०१५ रोजी कामही पूर्ण केले़ त्यामुळे बँकेत भरलेली अनामत रक्कम व रस्त्याच्या देखभालीचे शेवटच्या वर्षाचे बिल मिळावे यासाठी ठेकेदार या योजनेच्या प्रतिनियुक्तीवर आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे गेले होते़
लाचखोर अभियंता दशपुते यांनी बँकेतील अनामत तसेच रस्ता दुरुस्ती बिलाच्या रकमेची रिलीज आॅर्डर काढण्यासाठी ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर नंदुरबार व नाशिकच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला़ कॉलेजरोडच्या पाटील लेन, नंबर दोनमधील अंबर सोसायटीत ठेकेदाराकडून एक लाख रुपये घेताना अभियंता दशपुते यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत लाचखोर कार्यकारी अभियंता संजय दशपुते यांची चौकशी करीत होते़ बुधवारी(दि़८) दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ के़ ब्रह्मे यांच्या न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)