जुन्या नाशकात स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या अभियंत्याला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 01:52 AM2022-07-02T01:52:51+5:302022-07-02T01:54:17+5:30
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुरू असलेल्या कामांना राजकीय कार्यकर्तेच विरोध करत असून, दोन दिवसांपूर्वी पाटील गल्ली परिसरात एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुरू असलेल्या कामांना राजकीय कार्यकर्तेच विरोध करत असून, दोन दिवसांपूर्वी पाटील गल्ली परिसरात एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी संंबंधित हे कायकर्ते असल्याने त्यांच्यापासून संरक्षण मिळावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या परिसराचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्याशी संबंधित हे कार्यकर्ते असून, मारहाणीच्या प्रकारानंतर त्यांनाही स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयात बाेलवून मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत माेरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वप्नील शिवाजी दनवरे (वय २६, टाकळीरोड) असे जखमी झालेल्या अभियंत्याचे नाव असून, संदेश देवरे, सुशांत शेलार, नंदन भास्करे, अक्षय दाते, अभ्या खाडे यांच्यासह सहा जणांच्या विरोधात दंगल घडवणे, मारहाण करणे अशाप्रकारचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने १७१ कोटी रुपयांचा गावठाण विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत गावठाण भागात रस्ते तयार करताना यूटीलीटी लाइन्य भूमयारी करण्यात येत आहेे. परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविली जात असून, त्यासाठीच देशपांडे गल्ली ते म्हसोबा मंदिर आणि तेथून महाराणा प्रताप चौक येथे रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. २९ जून रोजी संबंधित आरोपींनी त्याठिकाणी येऊन रस्ते खोदकाम बंद काम कर, असे सांगून अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर संंबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे या भागात आता काम करण्यास ठेकेदार बी. जी. शिर्के कंपनीचे कर्मचारी तयार नसून त्यामुळे दोन दिवसांपासून काम ठप्प झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्याशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत असल्याने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात बोलावून चर्चा केली.
इन्फो...
पोलीस आयुक्त कंपनीचे संचालक असताना याच कंपनीच्या कामात अडथळे आणून गुंडागर्दी करण्यात येत आहे, हे विशेष आहे. त्याबद्दल स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात अशाप्रकारच्या मारहाणीच्या प्रकारामुळे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यामुळे काम वेळेत पूर्ण होेणे शक्य नाही त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोट...
स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये जेसीबी लावल्याने काही घरांना हादरे बसले तसेच तडे पडल्याने कार्यकर्त्यांशी वाद झाल्याचे कळले. वास्तविक, स्मार्ट सिटीशी चांगली चर्चा झाली असून, तेदेखील टप्प्याटप्प्याने नियोजन काम करीत आहेत.
- गजानन शेलार, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी