‘वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा’
By Admin | Updated: November 10, 2014 00:49 IST2014-11-10T00:48:33+5:302014-11-10T00:49:04+5:30
‘वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा’

‘वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा’
नाशिक : राष्ट्रीय वनाधिकार कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना वनाधिकाराचा न्याय मिळावा, त्यातील अडथळे, जाचक अटींना सूट देण्यात यावी. नव्या सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक सानप, सरचिटणीस प्रा. विनायक पगारे, चिटणीस वल्लभ रॉय, संघटक सदाशिव सोनवणे, भारती मोरे, अजय मालचे यांनी केली आहे.
दीड लाखाचा ऐवज घरफोडीत लंपास
नाशिक : भाभानगर येथील एका घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाक्याजवळील भाभानगरच्या क्षिप्रा सोसायटीत अनिल मेकू शुक्ला हे राहतात़ शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ त्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
टवाळखोरांचा इंदिरानगरला उपद्रव
नाशिक : इंदिरानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्याचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात शाळा आणि महाविद्यालये असल्याने त्यातील टवाळखोर विद्यार्थी बसस्थानकात उभे राहून विद्यार्थिनींची छेड काढीत असतात. तसेच सुसाट वाहने चालवून पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळत असतात. परिसरातील चेतनानगर, कलानगर आणि चर्चमागील परिसरात या टवाळखोरांचा बराच वेळ मुक्काम असतो. त्यातच त्यांची अनेक वेळा हाणामारी होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असते. जवळच असलेल्या पोलीस स्थानकात मात्र याची काहीच माहिती नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होते आहे.
गोळे कॉलनीत
६५ हजारांची चोरी
नाशिक : गोळे कॉलनीमध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या विक्रेत्याच्या बॅगेतील ६५ हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या चोरीची उकल झाली असून, भीक मागण्यासाठी आलेल्या चार महिलांनीच हे केल्याचे समोर आले़ उज्ज्वल रावसाहेब कदम (३६, रा. लोकमान्यनगर, गंगापूररोड) यांचे गिरणारे परिसरात मेडिकल स्टोअर आहे. शनिवारी दुपारी ते औषधे खरेदी करण्यासाठी गोळे कॉलनीतील तिरु पती एजन्सीमध्ये गेले होते़ औषधांच्या खरेदीसाठी ६५ हजारांची रोकड असलेली बॅग टेबलवर ठेवून दुकानातून औषधे घेत होते. त्याचवेळी त्यांच्या बॅगेतील रकमेची चोरी झाल्याचे त्यांना आढळून आले़ या घटनेनंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चार महिला एका लहान मुलासमवेत भीक मागण्यासाठी दुकानाजवळ आल्या होत्या. त्यांनीच कदम यांच्या बॅगेतील रोकड अलगदपणे काढून घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.
अस्वच्छतेमुळे
डासांचा उच्छाद
नाशिक : इंदिरानगर परिसरात अस्वच्छतेमुळे थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, येथे स्वच्छता कर्मचारीच नजरेस पडत नसल्याने रस्त्यांवर आणि वसाहतींमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच पडले आहेत. दिवाळीनंतर येथे स्वच्छता कर्मचारी न फिरकल्याने परिसरातील चेतनानगर आणि कलानगर परिसरातील अनेक वसाहतींमध्ये कचरा जसाच्या तसा पडलेला दिसतो आहे. याशिवाय घंटागाडीवरील कर्मचारी परिसरात खाली पडलेला कचरा उचलत नसल्याने अस्वच्छता अधिकच वाढली आहे. त्यामुळे डासांत वाढ झाली असून, डेंग्यूसारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.