सराफांचा संप अखेर मागे

By Admin | Updated: April 13, 2016 00:23 IST2016-04-13T00:16:54+5:302016-04-13T00:23:01+5:30

दुकाने उघडली : लग्नसराईच्या शेवटच्या टप्प्यात ग्राहकांना दिलासा

The end of the silver bangle | सराफांचा संप अखेर मागे

सराफांचा संप अखेर मागे

 नाशिक : केंद्र सरकारने लागू केलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिक ांचा गेले ४२ दिवसांचा संप मंगळवारी अखेर संपुष्टात आला. अबकारी कराच्या विरोधात सराफांनी पुकारलेला बंद मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतल्याने सोन्याला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून, लग्नसराईच्या अखेरच्या टप्प्यात का होईना सुवर्णकारांची दुकाने उघडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने सुवर्ण व्यवसायिकांवर लादलेल्या अबकारी कराविरोधात देशभरातील छोटे-मोठे सुवर्णकार आणि ज्वेलर्सनी गेल्या २ मार्चपासून शटर डाउन केलं होतं; मात्र आता सराफांनी नरमाईची भूमिका घेत ग्राहक आणि छोटा व्यापारी व या व्यवसायावर आधारित रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांचा विचार करून बंद मागे घेत १४ एप्रिलपासून दुकाने उघडणार असल्याचे सराफ संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले, तर काही व्यावसायिकांनी बंद मागे घेण्याची घोषणा होताच मंगळवारी सकाळी दुकाने उघडली आहेत. सुमारे दीड महिना सुरू असलेल्या या आंदोलन दरम्यान सराफांनी रेल रोको आंदोलन, शहरात मोर्चा काढून, साखळी उपोषण व लाक्षणिक उपोषणासारख्या वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करूनही सुवर्णकारांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सराफ व्यावसायिकांसोबतच या व्यवसायाशी संबंधित रोजंदारीवर काम करणारे कारागीर तसेच इतर कामगार कुटुंबीयांसह या मोर्चात सहभागी झाले होते. तरीही केंद्र सरकार कर आकारण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे व्यावसायिकांनी अखेर नमते घेत आंदोलनाचे शस्त्र म्यान केले. (प्रतिनिधी)

Web Title: The end of the silver bangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.