मनपाच्या भूखंडावरही गोठ्याचे अतिक्रमण
By Admin | Updated: June 1, 2016 00:43 IST2016-05-31T22:56:42+5:302016-06-01T00:43:57+5:30
नगरसेवकाचा प्रताप : प्रशासनाकडून कारवाईबाबत कायदेशीर चाचपणी

मनपाच्या भूखंडावरही गोठ्याचे अतिक्रमण
नाशिक : राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक विनायक तथा नय्या खैरे यांनी म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडलगत १८ मीटर डीपी रस्त्यावर जनावरांच्या गोठ्याचे अनधिकृत बांधकाम उभारण्याचा भीमपराक्रम तर केलाच शिवाय त्यासोबत सर्व्हे नंबर १९/२ ब या मंजूर अभिन्यासातील महापालिकेच्या मालकीचा १४९७ चौ.मी. मोकळ्या भूखंडावरही गोठ्याचे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. महापालिकेने सदर अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्यानंतर खैरे यांनी स्वत:हून बांधकाम हटविण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, खैरे यांच्यावर अपात्रतेसंबंधीच्या कारवाईबाबत मनपा प्रशासनाने कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे.
महापालिका आयुक्तांनी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले असतानाच राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक विनायक खैरे यांनाही सोमवारी (दि.३०) अनधिकृतपणे गोठ्याच्या बांधकामाबद्दल दणका दिला. खैरे यांनी म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडच्या समांतर १८ मीटर डीपी रस्त्यावर अनधिकृतपणे म्हशीचा गोठा थाटला होता. त्याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना केल्यानंतर खैरे यांनी आपले राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न करून पाहिला; परंतु तो फसल्यानंतर त्यांनी सोमवारी स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. महापालिका प्रशासनाकडून केवळ १८ मीटर डीपीरोडवरच अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात येत होते आणि रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, खैरे यांनी १८ मीटर डीपी रस्त्यावरच नव्हे तर मखमलाबाद येथील सर्व्हे नंबर १९/२ ब या मंजूर अभिन्यासातील मनपाच्या मालकीचा १४९७ चौ.मी. मोकळा भूखंडही बळकावत तेथे अनधिकृतपणे म्हशीचा गोठा थाटला असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचा मोकळा भूखंड हा केशव पिंगळे या जागामालकाकडून महापालिकेकडे ९ फेबु्रवारी २००७ मध्ये हस्तांतरित झालेला आहे. त्याबाबत कब्जा पावती करारनामाही नगररचनाच्या सहायक संचालकाने महापालिकेच्या लाभात नोंदून घेतलेला आहे.