नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

By Admin | Updated: June 26, 2014 00:47 IST2014-06-26T00:43:38+5:302014-06-26T00:47:58+5:30

नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

The encroachment of residents on the Nashik sugar factory's workplace | नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

 

पळसे : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाचा गेल्या सव्वा महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संतप्त रहिवाशांनी आज नासाकाचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना घेराव घालुन धारेवर धरले होते.
नाशिक साखर कारखाना व कर्मचारी वसाहत येथील वीजेचे बिल कारखाना प्रशासनाने न भरल्याने सव्वा महिन्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे कारखान्यात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने कारखान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये वीजच नसल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याकरिता रहिवाशांना वणवण करावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सर्वाधिक जास्त त्रास सहन करावा लागत आहे. सव्वा महिना होऊनही नासाका संचालक मंडळ व प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही.
रहिवाशांचा उद्रेक
नासाका प्रशासन वीज बिल भरण्याबाबत किंवा वीजपुरवठा सुरळीत सुरू होण्याबाबत कुठलीही तजवीज करीत नसल्याने रहिवाशांचा आज उद्रेक झाला. संतप्त रहिवासी, महिलांनी आज सकाळी ९ वाजता नासाका मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना घेराव घालुन आमची पाण्याची व विजेची त्वरित व्यवस्था करावी अन्यथा आम्ही तुम्हाला येथून जाऊ देणार नाही अशी कठोर भूमिका घेत घेराव घातला. संतप्त रहिवाशांनी जवळपास दीड तास मोठे यांना एकाच ठिकाणी बसवुन प्रश्नांचा भडीमार करत सहन करत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली.
यावेळी मोठे यांनी येत्या दोन दिवसात मार्ग काढुन कोणत्याही परिस्थितीत वीज व पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी घेराव आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)

Web Title: The encroachment of residents on the Nashik sugar factory's workplace