दिंडोरीरोड बाजार समितीबाहेर व्यावसायिकांचे अतिक्रमण
By Admin | Updated: November 19, 2015 23:17 IST2015-11-19T23:16:25+5:302015-11-19T23:17:04+5:30
दिंडोरीरोड बाजार समितीबाहेर व्यावसायिकांचे अतिक्रमण

दिंडोरीरोड बाजार समितीबाहेर व्यावसायिकांचे अतिक्रमण
पंचवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर असलेल्या रस्त्यालगतच्या दुकानदारांनी, तसेच विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. भर रस्त्यावर व्यावसायिक अतिक्रमण करीत असताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरच्या परिसरात गाळा संकुल असून याठिकाणी विविध वस्तू विक्रीची दुकाने आहेत. यातील काही दुकानदार, तसेच हॉटेलचालकांनी रस्त्यावर साहित्य मांडून अतिक्रमण करत मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे. सायंकाळच्या सुमारास बाजार समितीत विक्रीसाठी येणारी शेतमालाची वाहने, त्यातच रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक यामुळे पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. गाळा संकुलातील व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य भर रस्त्यावर मांडत असल्याने अतिक्रमण विभागाचा दुकानदारांना धाकच उरला नसल्याचे दिसून येते. दरम्यान, निमाणी बसस्थानकाजवळील पादचारी मार्गावरदेखील विविध वस्तू विक्री करणाऱ्या हातगाड्या तसेच फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना पादचारी मार्गाऐवजी मुख्य रस्त्याचाच ये-जा करण्यासाठी वापर करावा लागत आहे. (वार्ताहर)