पुरोहित संघाचे अतिक्रमण पुन्हा हटविले
By Admin | Updated: July 6, 2015 23:48 IST2015-07-06T23:47:45+5:302015-07-06T23:48:16+5:30
वाद चिघळला : पोलीस-महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषण व घोषणाबाजी

पुरोहित संघाचे अतिक्रमण पुन्हा हटविले
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने रामकुंडालगत असलेल्या पुरोहित संघाच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वीच हातोडा मारला होता; परंतु पुरोहित संघाने पुन्हा त्याच जागेवर कार्यालय थाटल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी सकाळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. दरम्यान, या कारवाईच्या विरोधात पुरोहित संघाने तेथेच ठाण मांडत उपोषण सुरू केले. सायंकाळी आमदारांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपामार्फत रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने रामकुंडालगत असलेल्या पुरोहित संघाचे कार्यालय हटविले होते. परंतु, काही दिवसांनंतर पुन्हा एकदा पुरोहित संघाने आपले कार्यालय उभारण्यास सुरुवात केली. त्यानुसार सोमवारी सकाळी अतिक्रमण विभागाच्या पथकाने पुन्हा एकदा कारवाई केली. पुरोहित संघाचे पदाधिकारी हे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या ध्वजरोहणाच्या कामात व्यस्त असताना प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले. त्याची कुणकुण पुरोहित संघाला लागताच संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच अन्य सहकाऱ्यांनी धाव घेऊन सदर कार्यालय हे आम्ही भाविकांच्या सोयीसाठी केल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरूच ठेवली. पथकाने गंगा गोदावरी मंदिराला लावण्यात आलेल्या जाळ्याही हटविल्या असतानाच पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांची मनपा व पोलीस प्रशासनाबरोबर शाब्दिक चकमकही उडाली. कारवाईविरोधात पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथेच ठाण मांडत उपोषण सुरू केले. या उपोषणाची वार्ता समजताच आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, अनिल वाघ यांनी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.