अतिक्रमणे मोकाट, मंडईत शुकशुकाट
By Admin | Updated: December 5, 2015 22:53 IST2015-12-05T22:53:06+5:302015-12-05T22:53:39+5:30
कृष्णकांत मंडई : पालिकेचे दुर्लक्ष; विक्रेते नाराज

अतिक्रमणे मोकाट, मंडईत शुकशुकाट
इंदिरानगर : येथील सावरकर चौकात अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, तब्बल ७० ते ८० विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे जवळच असलेल्या कृष्णकांत भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या मंडईतील विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असून, अधिकृत भाजीबाजारातील विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली आहे.
सावरकर चौक ते वनसंपदा कॉलनीदरम्यान गेल्या दहा वर्षांपासून व्यवसाय करीत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने नागरिकांनाही त्रास होत होता. त्याची दखल घेऊन महापालिकेने कलानगर येथे लाखो रुपये खर्च करून भाजीमार्केट बांधण्यात आले. कृष्णकांत भाजीमंडई असे त्याला नाव देण्यात आले. तेथे ओटे बांधण्यात आल्याने रस्त्यावर विक्री करणारे सारेच तेथे स्थलांतरित झाले. याठिकाणी पाण्याची सुविधा आणि अन्य सुविधा असल्याने सध्या याठिकाणी सुमारे ४० ते ५० विक्रेते व्यवसाय करीत आहेत; परंतु रस्त्यावरील हे भाजीविक्रेते अधिकृत बाजारात स्थलांतरित झाले असताना आता मात्र मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीविक्रेते याठिकाणी येऊन व्यवसाय करीत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून, संख्या २० ते २५ इतकी आहे. रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यामुळे येणारे नागरिक हे मंडईत जाण्यापेक्षा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडूनच भाज्या खरेदी करतात आणि परत जातात. त्याचा फटका अधिकृत विक्रेत्यांना बसत असून, ग्राहकच येत नसल्याने त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याने अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना त्वरित मंडईत व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे अन्यथा मंडईतील विक्रेतेही रस्त्यावरच येऊन व्यवसाय करतील, असा इशारा या विक्रेत्यांनी दिला आहे.