नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू

By Admin | Updated: November 18, 2015 23:20 IST2015-11-18T23:19:59+5:302015-11-18T23:20:31+5:30

आश्वासन : मांडलेली दुकाने, टपऱ्या काढून घेण्याची दर्शविली तयारी

Encroachment eradication campaign launched at Nandgaon | नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू

नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू

नांदगाव : नगर परिषदेपासून १०० फूट अंतरावर सुरू होणारे सावित्रीबाई कन्या विद्यालय ते देवी मंदिर या रस्त्यावरील अतिक्रमणे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत पोलीस बंदोबस्तात बुधवारी (दि. १८) काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस प्रशासनाशी अरेरावीची भूमिका घेणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अखेर नमते घेत शनिवारपर्यंत (दि. २१) स्वत: अतिक्रमणे काढून घेण्याची तयारी सर्व २२ जणांनी दाखविल्याने संघर्ष टळला. मात्र अंतिम मुदतीपर्यंत अतिक्रमण काढून घेतले नाही तर त्याचदिवशी त्वरित कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांच्याशी अतिक्रमणधारकांतर्फे नगरसेवक शिवाजी पाटील तसेच माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे, बाळासाहेब कवडे, सचिन कवडे यांनी मध्यस्थी केली. सदर अतिक्रमण काढून घेण्याविषयी नगर परिषदेने नोटिसा दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात तक्रारही करण्यात आली होती. २८ आॅक्टोबर रोजी अंतिम नोटीस दिल्यानंतरही अतिक्रमणधारकांनी जुमानले नव्हते. त्यामुळे आज पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने कारवाईला सुरुवात झाली.
साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर साडेतीन मीटरपर्यंत अतिक्रमणे करण्यात आली होती. रस्ता मोकळा झाल्यानंतर लगेच आरएमसी ट्रायमिक्स (रेडिमेड मिक्स काँक्रीट) तंत्राने रस्ता तयार होणार आहे. नांदगाव शहरात सदर तंत्राने तयार होणारा तो पहिलाच रस्ता असून, २६ लाख रुपये खर्चात चाळीसगावच्या बी.पी. पुन्शी कंपनीने तो बनवण्याचा ठेका घेतला आहे. आमदार पंकज भुजबळ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रस्त्यासाठी हा निधी मिळाला आहे.
काम झाल्यानंतर काही महिन्यांतच उखडून जाणाऱ्या रस्त्यांचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आरएमसी तंत्राचा रस्ता अधिक मजबूत व दीर्घकाळ टिकेल, असा दावा मुख्याधिकारी गायकवाड व अभियंता अभिजित इनामदार यांनी केला आहे. तसेच रस्ता तयार झाल्यानंतर अतिक्रमण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसे केल्यास त्या व्यक्तीवर सक्त कारवाई करू, असा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला असून, पोलीस निरीक्षक ठोंबे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
सदरचा रस्ता शहराचे दैवत एकवीरा मातेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. देवीच्या वर्षातून दोन मोठ्या यात्रा भरतात. त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. शहराच्या नव्याने वसणाऱ्या भागाकडे जाणारा हा रस्ता दिवसेंदिवस अतिक्रमणांमुळे अरुंद होत चालला होता.
सुनील बाहीकर, नथू चौधरी, अय्याज मन्सुरी, बाबासाहेब चवळे, मनीषा पैठणकर, विकास कुलथे, बाबुलाल महाले, आशाबाई काकळीज, पुष्पा वाघ, मूळचंद जोशी, शारदा जोशी, दत्तू आहिरे, पुंजाराम थोरात आदिंना प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्याविषयी नोटिसा दिल्या आहेत.
यानंतर शाकांबरी नदी पुलावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिली. शहराचा जलस्रोत असलेल्या शाकांबरी
व लेंडी नद्या अतिक्रमणांमुळे
लोप पावत असून, त्यांच्या तीरावर संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे प्रशासनाचे नियोजन आहे. आजच्या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे, तर सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Encroachment eradication campaign launched at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.