फुले, आंबेडकरांमुळे स्त्रियांचे सबलीकरण
By Admin | Updated: December 26, 2016 02:44 IST2016-12-26T02:42:43+5:302016-12-26T02:44:16+5:30
एकनाथ शिंदे : पुतळ्यांच्या अनावरणप्रसंगी प्रतिपादन

फुले, आंबेडकरांमुळे स्त्रियांचे सबलीकरण
उपनगर : महात्मा जोतिबा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत शिक्षणाची ज्ञानज्योत पोहोचली असून, शिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रियांचे सबलीकरण होत असून, देशातील महिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. फुले, आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे येथील महिलांनी वैज्ञानिक, क्रीडा व कलाक्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आगरटाकळी परिसरात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हांडोरे, रिपाइं (गवई गट) अध्यक्ष राजेंद्र गवई, खासदार राजीव सातव, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, जयंत जाधव, माजी महापौर अशोक दिवे आदि उपस्थित होते. शिंदे म्हणाले, जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या न्याय हक्कांची जाणीव झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला मूलभूत अधिकार देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांनी वंचित घटकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजाचा विकास साधणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, जयंत दिंडे, शरद अहेर, शोभा बच्छाव, वंदना मनचंदा, मेघा साळवे, उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल दिवे यांनी केले. प्रशांत दिवे यांनी आभार मानले.