कर्मचाऱ्यांना सानुग्रह @ १३,१११

By Admin | Updated: September 11, 2014 00:25 IST2014-09-10T20:55:04+5:302014-09-11T00:25:57+5:30

कर्मचाऱ्यांना सानुग्रह @ १३,१११

Empower employees @ 13,111 | कर्मचाऱ्यांना सानुग्रह @ १३,१११

कर्मचाऱ्यांना सानुग्रह @ १३,१११

नाशिक : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांना १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी ही घोषणा केली. लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार असून, त्यात हा विषय अडकू नये यामुळे आत्ताच निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी सांगितले असले, तरी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही घाई करण्यात आल्याचे स्पष्ट आहे.
महापालिकेच्या सात हजार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईलच; शिवाय पालिका शिक्षण मंडळाचे शिक्षक आणि कर्मचारी तसेच सर्व मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनादेखील त्याचा लाभ मिळणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांवर सात कोटी ८० लाख, तर शिक्षण मंडळाचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दोन कोटी २५ लाख असा दहा कोटी रुपयांचा खर्च होणार असून, तितकाच पालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे.
गेल्या दिवाळीच्या वेळीदेखील महापौरांनी ११ हजार १११ रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वपक्षीय कामगार संघटनांनी विरोध केल्यानंतर १३ हजार १११ रुपये सानुग्रह देण्याचे महापौरांनी जाहीर केले. परंतु तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ११ हजार १११ रुपये तत्काळ आणि दोन हजार रुपये मार्च २०१४ पर्यंत देण्यात येतील अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात ही रक्कम कर्मचाऱ्यांना आजवर मिळालेली नाही. त्यानंतर आता महापौरांनी गेल्यावेळ इतक्याच रकमेची घोषणा केली आहे. दिवाळीच्या आधी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असेही महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Empower employees @ 13,111

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.