थम्ब मशीनला कर्मचाऱ्यांचा ठेंगा

By Admin | Updated: July 23, 2016 01:21 IST2016-07-23T01:15:30+5:302016-07-23T01:21:56+5:30

मनपा सिडको विभाग : लेटलतिफांना होतोय फायदा

Employees' Stag | थम्ब मशीनला कर्मचाऱ्यांचा ठेंगा

थम्ब मशीनला कर्मचाऱ्यांचा ठेंगा

 नरेंद्र दंडगव्हाळ  सिडको
कर्मचारी कामावर वेळेवर हजर राहत नसल्याने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून थम्ब मशीन बसविण्यात आले आहे. या थम्ब मशीनप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार निघत नसल्याने कर्मचाऱ्यांची कामावर येण्याची व कामावरून घरी जाण्याची वेळच निश्चित नसून कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे थम्ब मशीनला ठेंगाच दिल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेवर हजर राहून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावी यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने मनपाच्या सर्व विभागांत थम्ब मशीन ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. थम्ब मशीन बसविण्यामागे मनपा कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहण्याची सवय लागेल व सर्वसामान्य नागरिकांची कामेदेखील वेळेवर होण्यास मदत होऊ शकते हा दृष्टिकोन महानगरपालिकेने डोळ्यासमोर ठेवला असला तरी अद्यापपर्यंत याचा मनपाला काही फायदा झाल्याचे चित्र बघावयास मिळत नाही. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी म्हणून आर. आर. गोसावी हे कार्यभार पाहत आहेत. सध्या त्यांच्याकडे सातपूर विभागाचाही अतिरिक्त भार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सिडको विभागात बांधकाम, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, एक खिडकी योजना यांसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मिळून
सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी कामकाज करीत आहेत, परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची तसेच कामावरून घरी जाण्याची वेळच नाही. दुपारी जेवणाची सुटी कधी होते आणि कर्मचारी केव्हा कामावर येतात याबाबत नागरिक ांना अद्यापही
माहिती नाही.
विशेष म्हणजे उशिराने कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील स्वाक्षरी नोंदवही केव्हाही कामावर रुजू झाल्यानंतर मिळत असल्याने आजवर कोणीही वेळेवर येण्याची व उशिरापर्यंत हजर राहण्याची तसदी घेतली नाही. अर्थात उशिराने जरी कामावर हजर झाले तरी कधीही लेटमार्क लागत नसल्याने यावर कोणी विचारतही नाही. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चाप बसावा यासाठी ही थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. थम्ब मशीन बसविल्यानंतरही काही दिवस सुरूच करण्यात आले नव्हते.

Web Title: Employees' Stag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.